पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत मोशी कचरा डेपो तातडीने बंद करून पुनावळे कचरा डेपो कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात वाघेरे यांनी म्हटले आहे की, १९८२ पासून सुरू असलेल्या मोशी कचरा डेपोची क्षमता अनेक वर्षांपूर्वीच संपली होती. तरीही तो सुरू ठेवण्यात आल्यामुळेच ही दुर्घटना घडली आणि निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून विकास आराखड्यात आरक्षित असलेला पुनावळे कचरा डेपो तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच २०१२ मध्ये तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात पुनावळे कचरा डेपो सुरू करण्यासाठी उपोषण व निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वाघेरे यांनी नमूद केले आहे.
निवेदनात पुनावळे कचरा डेपोला विरोध करणारे काही राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि इतर संबंधित व्यक्तींवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या विरोधामुळेच पुनावळे डेपो सुरू होऊ शकला नसल्याचा दावा करत, मोशी दुर्घटनेसाठी जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, निवेदनातील आरोप हे रमेश वाघेरे यांनी केलेले असून त्याबाबत संबंधितांचा अधिकृत प्रतिसाद अद्याप समोर आलेला नाही.
