Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी परिसरात भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसाची पर्वा न करता हजारो वारकरी आणि भाविकांनी पालखीचे दर्शन घेत “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

दापोडीतील विसावा स्थळी भाविकांनी पालखीचे दर्शन घेत कपाळावर अष्टगंध लावून विठ्ठल नामाचा गजर केला. महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीत सहभाग घेतला, तर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पुलावरून पालखीचे दर्शन घेत भक्तीचा आनंद लुटला. परिसरात वारकऱ्यांसाठी विविध सेवाकार्ये, खेळण्यांची दुकाने आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक राजू बनसोडे यांच्या पुढाकाराने डॉ. मोनिका रसाळ, डॉ. संदीप बांगर, डॉ. वंदना काटे, डॉ. श्वेता बाईत आणि डॉ. वैशाली खोब्रागडे यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्तदाब व रक्तातील साखर तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
शहर सुधार समितीचे अध्यक्ष संजय नाना काटे यांच्या हस्ते वारी व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्युत, आरोग्य, स्थापत्य, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी माजी आमदार अश्विनीताई जगताप, खासदार अमर साबळे आणि इंटक अध्यक्ष यशवंत भोसले यांचाही सन्मान करण्यात आला.

दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पवळे, वंदना ठोक तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी चोख बंदोबस्त ठेवला.

कै. हभप गजानन जोशी व कै. हभप कमलाबाई जोशी यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मानसी गदम, सविता कुदळे, शोभा जोशी, राजश्री बाईत, जयश्री भाडाळे आदी महिलांनी सुमारे एक हजार भाकऱ्या तयार करून वारकऱ्यांना अन्नसेवा दिली. बाराठे वस्तीच्या वतीने ५०० ‘पसायदान’ पुस्तिकांचे, तर श्री. रविंद्र बाईत व मित्रपरिवाराच्या वतीने १,००० हरिपाठ पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

जॉली क्लबच्या वतीने वारकऱ्यांसाठी मुक्कामाची व्यवस्था, तसेच डॉ. गजानन महाराज वाव्हळ यांची प्रवचन सेवा आणि शिवशाही ढोल पथकाचा भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बाबू ऐप्रे यांनी सलग ५० वर्षे वारकऱ्यांची सेवा केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. पंढरपूरकडे निघालेल्या पायी वारीचा साकारलेला देखावाही भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

दापोडीत यंदाचा पालखी सोहळा भक्ती, सेवा, सामाजिक उपक्रम आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अविस्मरणीय ठरला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version