Spread the love

राष्ट्रवादी कॉँग्रेसची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी बरखास्त
निरीक्षक सुनील माने यांच्याकडे जबाबदारी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी –शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत अधिक मजबूत, गतिमान आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने तसेच नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या हेतूने पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बरखास्त केली आहे. प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते तथा पिंपरी चिंचवडचे पक्षनिरीक्षक सुनील माने यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पुणे शहर, पिंपरी- चिंचवड व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नुकतीच राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकी दरम्यान शशिकांत शिंदे आणि पिंपरी चिंचवडचे पक्ष निरीक्षक सुनील माने व पदाधिकारी यांच्यात पिंपरी चिंचवड येथील पक्षाच्या कार्यकारिणी बद्दल विस्तृत चर्चा झाली. या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्षांनी पिंपरी चिंचवडची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी करण्याचा निर्णय घेतला. आज याबाबत अधिकृतरीत्या पक्षाने पत्रक काढून त्याबाबत कळवले आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्याशी सल्लामसलतीनुसार व आजी माजी पदाधिकारी यांच्याशी चर्चेनंतर नवीन कार्यकारिणी गठित करण्याची जबाबदारी निरीक्षक सुनील माने यांच्याकडे देण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी गठित करताना महिला, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, ओबीसी व इतर सर्व संवर्गातील निष्ठावंत व पक्षात सक्रिय कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पक्षात प्रदीर्घ काम करणारे नेते आणि तरुण कार्यकर्ते यांचा सुवर्णमध्य नवीन कार्यकारिणीत साधला जाईल. पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ आणि प्रभागांमधील प्रमुख पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून, खासदार अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षाच्या कार्यक्रमात, आंदोलनात आणि जनसंपर्कात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना नवीन कार्यकारिणीत समाविष्ट करून घेतले जाणार असल्याचे निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version