पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, या संकटात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (पीडीआरएफ) आणि अग्निशामक दलाने उल्लेखनीय बचावकार्य केले आहे. विविध भागांत अडकलेल्या १५० हून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, एका ८ महिन्यांच्या चिमुकल्यासह वृद्ध नागरिकांचेही प्राण वाचवण्यात यश आले.
वाकसाई, मळवली, लोणावळा, कार्ले आणि लोहगाव परिसरात अडकलेल्या नागरिकांना लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, दोरी आणि बोटींच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मळवली येथे एका ८ महिन्यांच्या बाळासह १५ नागरिकांची, तर लोणावळ्यातील विविध व्हिलांमधून अनेक कुटुंबांची सुखरूप सुटका करण्यात आली. लोहगावमध्ये पाण्यात अडकलेल्या बसमधील १० ते १२ प्रवाशांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
खेड तालुक्यातील रेटवडी येथे भीमा नदीवरील बंधारा फुटल्यानंतर वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा शोध घेऊन त्याला बाहेर काढण्यात आले असून, शेलू येथे बुडालेल्या व्यक्तीचा शोध अद्याप सुरू आहे. तसेच लोणावळ्याजवळील नॉर्थ पॉईंट आणि श्री सिक्स्टी रिसॉर्ट परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध पीडीआरएफकडून सुरू आहे.
दरम्यान, अग्निशामक दलाने देहूरोड पुलाजवळ रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली, तर लोणी काळभोर येथील पॉलिहाऊस नर्सरीला लागलेली आगही तातडीने आटोक्यात आणली.
पीएमआरडीए प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
