साक्षरतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम – महापौर रवि लांडगे
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र शासनाच्या उल्लास–नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा प्रथमच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ हा जनजागृतीपर चित्ररथ सहभागी होत आहे. हा चित्ररथ आकुर्डी ते पंढरपूर या पालखी मार्गावर वारकऱ्यांमध्ये शिक्षणाचा संदेश पोहोचविणार असून, शिक्षण विभागाचे १० कर्मचारी संपूर्ण पालखी सोहळ्यात सहभागी होऊन साक्षरता अभियान राबविणार आहेत.
या चित्ररथाचे उद्घाटन महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते वसंतदादा पाटील विद्यामंदिर येथे संपन्न झाले. यावेळी महापालिकेचे उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाचे कृष्णकुमार पाटील, उपसंचालक वंदना वावळ, गणपत मोरे, सहाय्यक संचालक सतीश चौधरी, शिक्षण उपनिरीक्षक रमेश चव्हाण तसेच शिक्षण विभागाचे सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून साक्षरतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ या चित्ररथाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व आणि निरक्षरता निर्मूलनाचा संदेश वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची संधी मिळावी, आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. पिंपरी चिंचवड शहर शंभर टक्के साक्षर करण्यासाठी महापालिकेचा ‘अक्षर विश्व’ हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण हा अभिनव उपक्रम राबवत आहोत. महापालिकेच्या १३५ शाळांमधून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ ही शिक्षण विभागाची अत्यंत स्तुत्य संकल्पना आहे. दहा शिक्षकांची टीम पालखी सोहळ्यात सहभागी होत सुमारे दहा लाख वारकऱ्यांपर्यंत साक्षरता अभियानाचा संदेश आणि शासनाच्या शिक्षणविषयक योजनांची माहिती पोहोचविणार आहे. शिक्षण हीच समाजाची खरी ताकद आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षित झाला तर पुढील पिढ्यांचे भविष्य अधिक सक्षम होते, असे देखील ते म्हणाले.
‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ उपक्रमाचा उद्देश
‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश निरक्षर आणि अल्पशिक्षित नागरिकांची नोंदणी करून त्यांना साक्षरतेसाठी प्रोत्साहित करणे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. पालखी मार्गावरील वारकरी, नागरिक आणि भाविकांशी संवाद साधून साक्षरता अभियानाचा व्यापक प्रसार केला जाणार आहे.
