Spread the love

​”पवना धरणातील जलसाठा वाढला, आता कपातीची अट शिथिल करा! शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत पूर्ण क्षमतेने करण्यासाठी शत्रुघ्न काटे आग्रही”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, महानगरपालिकेने शहरात लागू केलेली १५ टक्के पाणीकपात आता तातडीने रद्द करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री डॉ.विजय सूर्यवंशी यांना एक अधिकृत लेखी निवेदन सादर केले आहे.

​निवेदनात श्री. शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे कि, यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. उपलब्ध पाणी जास्त दिवस टिकवण्याच्या नियोजनात्मक हेतूने महापालिकेने शहरात १५% पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला होता. एक सजग लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रशासकीय पातळीवरील या निर्णयाचा आदर करत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

​मावळ भागात अतिवृष्टी; पाणी पातळी झपाट्याने वाढली:👇
परंतु, गेल्या चार ते पाच दिवसांपासून संपूर्ण मावळ परिसर तसेच धरण क्षेत्रात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले आहे. सर्वत्र अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पवना धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू असून पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. धरण क्षेत्रातील ही सद्यस्थिती अत्यंत समाधानकारक आणि दिलासादायक आहे.

​नागरिकांमधील असंतोष दूर करा – श्री शत्रुघ्न काटे
“एकीकडे धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठा होत असताना, दुसरीकडे मात्र शहरातील नागरिकांना अजूनही कपातीचा सामना करावा लागत आहे. अनेक सोसायट्या आणि प्रभागांमध्ये अपुऱ्या व कमी दाबाने पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे,” याकडे शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.

​पावसाचा वाढलेला जोर आणि धरणातील पाण्याची वाढती आवक पाहता प्रशासनाने कपातीची अट त्वरित शिथिल करावी आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांना पूर्ववत पूर्ण क्षमतेने व सुरळीत पाणीपुरवठा करून दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आता यावर महापालिका प्रशासन काय सकारात्मक पाऊल उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version