पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला उपलब्ध पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आणि कोणावरही अन्याय न करता पवना बंदिस्त जलवाहिनी योजना मार्गी लावण्याची सकारात्मक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने ही योजना मार्गी लागेल, असा विश्वास मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मुंबईत झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे तसेच पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पवना बंदिस्त जलवाहिनी योजना मार्गी लागणे आवश्यक आहे. ही योजना करताना १८ गावाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. त्यासाठी आताच तिसरी जलवाहिनी टाकावी. कोणावरही अन्याय होऊ देऊ नये. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. कोणताही प्रश्न प्रलंबित न ठेवता योजना मार्गी लावावी. महापालिका, राज्य शासन योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे किवळेत बंदिस्त जलवाहिनीतील पाईप बांधकाम विभागाच्या संगनमताने काढण्यात आले आहेत. यावर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे.
