Spread the love

पत्रकार रोहित खर्गे यांना ‘भला माणूस’ पुरस्कार जाहीर

नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार सन्मान

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची राहणार उपस्थिती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जेष्ठ संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘भला माणूस’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे सचिव तथा ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोरील सायन्स पार्क येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा, उद्योग, कला आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

थरार न्यूज नेटवर्कचे संपादक रोहित खर्गे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत सामाजिक बांधिलकी जपली आहे. विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि गरजूंसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीने त्यांची ‘भला माणूस’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.

या सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उद्योजक राजेश सांकला, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष तथा उद्योजक सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब तसेच राष्ट्रपती पोलीस पदक विजेते ज्येष्ठ कवी सीताराम नरके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

साहित्य, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना एकाच व्यासपीठावर गौरविणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याकडे शहरातील साहित्यप्रेमी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version