पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्येही शिक्षणाची वाट न सोडता जिद्दीने यश मिळवणारी ऋतुजा पोपट आरणे ही अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
आपल्या यशाची माहिती देताना ऋतुजा सांगते कि, माझे शिक्षण पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बालवाडीतून सुरू झाले. त्यानंतर कॅम्प एज्युकेशन शाळा, प्राधिकरण येथे प्राथमिक शिक्षण, काही काळ जिल्हा परिषद शाळा, जातेगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर), पुढे श्री राजर्षी शाहू महाराज विद्यालय, शरदनगर आणि श्री सरस्वती विद्यालय, आकुर्डी येथे शिक्षण घेत तिने बारावी पूर्ण केली. त्यानंतर कॅम्प एज्युकेशन ज्युनिअर आणि सीनियर कॉलेजमधून पदवी शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
पाच मुली आणि एका मुलाचा मोठा परिवार, घराची जबाबदारी आणि मर्यादित परिस्थिती असूनही ऋतुजाने कधीही शिक्षणात खंड पडू दिला नाही. वडील पोपट आरणे आणि आई रेखा आरणे यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने केलेले कष्ट तिच्या यशामागची मोठी ताकद ठरली.
शिक्षणाबरोबरच चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, शिवणकाम, वक्तृत्व आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यातही ऋतुजा पुढे आहे. तिच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा प्रभाव तिच्या धाकट्या बहिणी रोहिणी, अमृता, रेणुका, अंजली तसेच भाऊ प्रथमेश यांच्यावरही पडला असून तेही शिक्षणात प्रगती करत आहेत.

आता ऋतुजाचे ध्येय महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि (UPSC) परीक्षेत यश मिळवून अधिकारी बनण्याचे आहे. त्यासाठी ती स्पर्धा परीक्षा अकॅडमीत प्रवेश घेऊन पुढील तयारी सुरू करणार असल्याचे तिने सांगितले.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि पालकांचा विश्वास असेल तर यश नक्की मिळते,” हा संदेश ऋतुजाचा प्रवास देऊन जातो.