– आमदार महेश लांडगे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पूर्णत्वाच्या दिशेने
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणीय विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘नमामी इंद्रायणी’ (इंद्रायणी नदी सुधार) प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या ८ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आली. दरम्यान, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्याने प्रत्यक्ष कामाचा मार्गही मोकळा झाला आहे.
पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाच्या निमित्ताने विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन दि.८ जुलै रोजी करु, असे आश्वासित केले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील लाखो वारकऱ्यांचा मेळा असलेल्या आषाढी वारी पाखली सोहळ्याचे प्रस्थान याच दिवशी होणार आहे.
केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेअंतर्गत सुमारे ४३०.७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करणे, जलगुणवत्ता सुधारणे, नदीकाठाचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांसाठी पर्यावरणपूरक नदीकिनारा विकसित करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. शहराच्या पर्यावरणीय भविष्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आता मूर्त स्वरूप मिळत आहे.
महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत या प्रकल्पासाठी आठ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी तीन निविदा तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्यानंतर आर्थिक छाननी करण्यात आली. त्यामध्ये मे. एल.सी. इन्फ्रा प्रा. लि. यांची सुधारित निविदा सर्वात लाभदायक ठरली. अंदाजित खर्चापेक्षा सुमारे तीन टक्के कमी दराने कंपनीने काम करण्याची तयारी दर्शविल्यामुळे महापालिकेच्या निधीची बचत होण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण कामाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाला बळ…
या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या सहभागातून सुमारे ५२६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता यापूर्वीच मिळाली होती. त्यानंतर अंतिम झालेल्या ४३० कोटी ७५ लाख ६१ हजार ७७७ रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली. या रकमेमध्ये रॉयल्टी तसेच मटेरियल टेस्टिंग शुल्काचा समावेश असून, प्रकल्पाची कामकाजाची मुदत ३६ महिने निश्चित करण्यात आली आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रालगत ६० एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर इंद्रायणी नदीचे नैसर्गिक स्वरूप जपणे, नदीपात्रातील गाळ व प्रदूषण कमी करणे, नदीकाठाचे सुशोभीकरण, हरित क्षेत्र विकसित करणे, पादचारी सुविधा निर्माण करणे तसेच पर्यावरणपूरक नागरी विकासाला चालना देणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक नदीकिनाऱ्याचा लाभ मिळणार असून, पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाला नवे बळ मिळणार आहे.
“इंद्रायणी नदी ही आपल्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यावरणीय वारशाचा अविभाज्य भाग आहे. या नदीचे पुनरुज्जीवन म्हणजे भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. अमृत २.० अंतर्गत या प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ८ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला वेग मिळेल.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
