Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांची संख्या वाढली असली, तरी योग्य डॉक्टरांची निवड करणे हे सर्वसामान्य नागरिकांसमोर उभे राहिलेले एक महत्त्वाचे आव्हान आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे उपचारांच्या असंख्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत; मात्र योग्य वेळी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचणे तितकेच आवश्यक आहे.वाढत्या पर्यायांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी योग्य डॉक्टरांची निवड करणे हे एक महत्त्वाचे आव्हान बनले आहे. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने रुग्ण-डॉक्टर नात्याचा विश्वास, योग्य उपचारांची गरज आणि बदलत्या वैद्यकीय क्षेत्राविषयी डॉ. अमित नेमाणे यांनी मांडलेले विचार…”

डॉ. अमित नेमाणे हे अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. या काळात हजारो रुग्णांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या उपचारांतील चांगले-वाईट अनुभव, काही प्रेरणादायी तर काही अत्यंत वेदनादायी घटनाही ऐकायला मिळाल्या. दुसरीकडे, डॉक्टरांच्या बैठकींमध्येही अनेक वैद्यकीय अनुभव समोर येतात. या सर्व अनुभवांतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वास जितका महत्त्वाचा आहे, तितकीच योग्य डॉक्टरांची निवडही महत्त्वाची आहे.

अलीकडच्या काळात डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहेत. कोणत्याही परिस्थितीत हिंसा हा प्रश्नांचा मार्ग असू शकत नाही. परंतु दुसरीकडे, काही रुग्ण चुकीच्या निदानामुळे, उपचारात झालेल्या विलंबामुळे किंवा योग्य तज्ज्ञाकडे वेळेवर न गेल्यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जातात. त्यामुळे प्रत्येक घटनेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होणे आवश्यक आहे.

आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती येण्याची वाट पाहण्यापेक्षा आपल्या परिसरातील वैद्यकीय सुविधा, उपलब्ध रुग्णालये, त्यांतील तज्ज्ञ डॉक्टर आणि आपत्कालीन सेवा यांची माहिती प्रत्येक नागरिकाने आधीच करून ठेवली पाहिजे. अचानक गंभीर आजार किंवा अपघात झाल्यानंतर योग्य डॉक्टर किंवा सुसज्ज रुग्णालय शोधण्यात मौल्यवान वेळ वाया जातो आणि त्याची मोठी किंमत रुग्णाला मोजावी लागू शकते.

डॉक्टरांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे; मात्र अंधविश्वास ठेवणे योग्य नाही. आवश्यक वाटल्यास “सेकंड ओपिनियन” घेण्यास कोणतीही हरकत नाही. जगभर ही पद्धत स्वीकारली जाते आणि अनेकदा योग्य उपचारांचा मार्ग अधिक स्पष्ट होतो.

कोणताही वैद्यकीय पदवीधर डॉक्टर अयोग्य नसतो. प्रत्येक डॉक्टराने कठोर परिश्रम करून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले असते. मात्र वैद्यकीय क्षेत्रात अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक मानला जातो. कदाचित म्हणूनच या व्यवसायाला “मेडिकल प्रॅक्टिस” असे संबोधले जाते.

आज वैद्यकीय क्षेत्रात विविध सुपर स्पेशालिटी आणि फेलोशिपधारक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक आजारासाठी योग्य तज्ज्ञाची निवड करणे अधिक सोपे झाले आहे. हृदयरोग, मेंदूचे आजार, कर्करोग, मूत्रपिंड विकार, बालरोग किंवा दंतआरोग्य—प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र तज्ज्ञ उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या आजारानुसार योग्य विशेषज्ञाकडे जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉक्टर निवडताना खालील बाबींचा विचार करणे उपयुक्त ठरते.
डॉक्टरांचे शैक्षणिक पात्रता व विशेष प्रशिक्षण
संबंधित आजारावरील अनुभव
रुग्णालयातील उपलब्ध सुविधा
इतर रुग्णांचे अनुभव
आवश्यक असल्यास दुसरे वैद्यकीय मत (Second Opinion)
मात्र एवढी काळजी घेऊनही अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत, म्हणून डॉक्टर अयोग्य आहेत, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. वैद्यकशास्त्र हे विज्ञान आहे; चमत्कार नव्हे. प्रत्येक रुग्णाची प्रकृती, आजाराची तीव्रता आणि शरीराची उपचारांना मिळणारी प्रतिक्रिया वेगवेगळी असते.
डॉक्टरांना देव मानण्याची परंपरा आपल्या समाजात आहे. त्या भावनेचा आदर ठेवत असताना हेही लक्षात ठेवले पाहिजे की डॉक्टर हेही आपल्यासारखेच अभ्यास, अनुभव आणि विज्ञानाच्या आधारे उपचार करणारे माणूसच असतात. विज्ञानालाही काही मर्यादा असतात आणि प्रत्येक आजार पूर्णपणे बरा होईल, याची हमी कोणतेही वैद्यकशास्त्र देऊ शकत नाही.

काही वेळा दीर्घकालीन आजारांमध्ये अपेक्षित सुधारणा होत नसल्यास रुग्ण बाबा-बुवा, अंधश्रद्धा किंवा अप्रमाणित उपचारांच्या आहारी जातात. अशा गोष्टींमुळे वेळ, पैसा आणि आरोग्य या तिन्हींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणताही पर्यायी उपचार स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याबाबत प्राथमिक माहिती ठेवणे महत्त्वाचे आहे; मात्र इंटरनेट किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीच्या आधारावर स्वतःच डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करू नये. उपचारासाठी डॉक्टरांकडे जाताना आजाराचा संपूर्ण इतिहास, पूर्वीची औषधे, तपासण्यांचे अहवाल आणि इतर आवश्यक माहिती प्रामाणिकपणे सांगणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

शहरी भागात सुपर स्पेशालिटी डॉक्टर सहज उपलब्ध असतात; परंतु ग्रामीण भागात ही सुविधा मर्यादित असू शकते. त्यामुळे गंभीर आजाराची लक्षणे दिसताच वेळ न दवडता सुसज्ज रुग्णालयात किंवा योग्य तज्ज्ञाकडे जाण्याचा निर्णय घेणे अनेकदा जीव वाचवणारे ठरते.
डॉक्टरांनीही आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालणे, नैतिक मूल्यांचे पालन करणे आणि रुग्णसेवा हेच सर्वोच्च ध्येय मानून कार्य करणे आवश्यक आहे. डॉक्टर आणि रुग्ण या दोघांमध्ये परस्पर विश्वास, पारदर्शक संवाद आणि विज्ञानाधिष्ठित उपचार यांचा समतोल राखला गेला, तर देशाची आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल.
योग्य डॉक्टरांची योग्य वेळी केलेली निवड ही केवळ उपचाराची सुरुवात नसून, अनेकदा जीवन वाचविण्याची पहिली पायरी असते.

— डॉ. अमित वामन नेमाणे
दंतचिकित्सक, कॉस्मेटिक डेंटिस्ट व इम्प्लांटोलॉजिस्ट
अध्यक्ष, भाजप वैद्यकीय प्रकोष्ठ, पिंपरी-चिंचवड शहर
प्रदेश उपाध्यक्ष, MESMA डॉक्टर असोसिएशन, महाराष्ट्र
प्रेरणादायी वक्ते, आरोग्यविषयक लेखक व सामाजिक कार्यकर्ते

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version