Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प ८’ हा बहारदार कलोत्सव पद्माकर कुलकर्णी रामकृष्ण सभागृह, चिंचवड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संगीत, नृत्य, कविता, लोककला, चित्रकला, मिमिक्री, ग्राफिटी, अभिवाचन आणि कराओके अशा विविध कलाप्रकारांनी सजलेल्या या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान नटराज पूजन व पारंपरिक गार्हाण्याने झाली. बालकलाकार कु. व्रिहा काळे हिने सादर केलेल्या आकर्षक गणेशवंदनेने कार्यक्रमाला मंगलमय प्रारंभ झाला. त्यानंतर शिवाजी घोडे यांच्या सुमधुर सॅक्सोफोन वादनाने सभागृह सुरेल स्वरांनी भारावून गेले.

कविसंमेलनात वंदना इन्नानी आणि अशोक होनराव यांनी आपल्या प्रभावी कवितांमधून रसिकांची भरभरून दाद मिळवली. जयवंत भोईर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक गोंधळ गीत सादर करून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला.

सौ. उज्वल पाटील यांनी आपल्या खुमासदार मिमिक्रीने उपस्थितांना मनमुराद हसविले, तर अश्विनी कोटस्थाने यांनी प्रभावी अभिवाचनातून साहित्याची अनुभूती दिली. हरीश मोरे यांनी ग्राफिटी कलेचा आधुनिक आविष्कार सादर करून रसिकांचे लक्ष वेधून घेतले.

कराओके गायनात योगेश प्रजापती आणि देवदत्त राजगुरू यांनी सुरेल गीतांनी वातावरण संगीतमय केले. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रकार धीरजकुमार दत्तात्रय दीक्षित आणि रमेश खडबडे यांच्या उत्कृष्ट चित्रकृतींचे भरविण्यात आलेले चित्रप्रदर्शन, ज्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुहास जोशी, राजू बंग, प्रकाश ढवळे, आसाराम कसबे, गौरी लोंढे पंकज चव्हाण विवेक क्षीरसागर आणि राजू जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शोभा जोशी, श्रीकांत चौगुले आणि जितेंद्र रॉय यांची विशेष उपस्थिती लाभली.

यापुढेही नवोदित कलाकारांना ‘कलाकार कट्टा’ या व्यासपीठाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली जाणार असून इच्छुक कलाकारांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज अहेरराव यांनी केले. सीमा गांधी यांनी आपल्या ओघवत्या आणि बहारदार शैलीतील सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली, तर सुहास जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विविध कलांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा कलोत्सव कलाकार आणि रसिक यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारा ठरला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version