Spread the love

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत पक्षांचा सक्रिय सहभाग आवश्यक – अर्चना यादव

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातर्फे राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीमध्ये मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे कामकाज, वेळापत्रक आणि प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, ३० जून २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत एन्युमरेशन फॉर्मचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. तसेच प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, हरकती व सुनावणी प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी राजकीय पक्षांनी यादी भागनिहाय बीएलए-२ (BLA-2) नियुक्त करणे आवश्यक असून, मतदार यादी अद्ययावत व अचूक करण्यासाठी प्रशासनासोबत राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे अर्चना यादव यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थित पक्ष पदाधिकारी व प्रतिनिधींनी मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version