Spread the love

परकीय भाषा शिक्षक परिषद २०२६ उत्साहात संपन्न

पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘जागतिक पातळीवर भावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे असून ते आत्मसात करणे गरजेचे आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ जर्मन भाषातज्ज्ञ डॉ. सविता केळकर यांनी पुणे विद्यार्थी गृह शिक्षण संकुल सभागृह, पर्वती, पुणे येथे रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी केले.

भाषा अकॅडमी, पिंपरी आयोजित परकीय भाषा शिक्षक परिषद २०२६ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डाॅ. सविता केळकर बोलत होत्या. जर्मन भाषातज्ज्ञ अरविंद लिगाडे, ज्येष्ठ विद्यापीठ भाषा संचालक जावेद अत्तार, पुणे विद्यार्थी गृह संचालक सुनील रेडेकर, जापनीज भाषातज्ज्ञ गंधाली शिधये, भाषा अकॅडमीचे संस्थापक – अध्यक्ष दीपक पागे, संचालिका प्रीती गायतोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सविता केळकर पुढे म्हणाल्या की, ‘स्वतःच्या मनाचा कल ओळखा, न्यूनगंड बाजूला सारून बदलांना सामोरे जा, स्वप्न बघा आणि गुरुजनांवर विश्वास ठेवा, कष्टाला पर्याय नाही म्हणून कधीही आशा सोडू नका, सहकाऱ्यांचा आदर करा आणि हॅण्ड – हेड – हार्ट या तीन ‘एच’चा कौशल्याने वापर करा!’ यावेळी जागतिक संगीतदिनानिमित्त डाॅ. सविता केळकर यांनी बिगुल (माऊथ ऑर्गन) वर गीत सादर करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली. अरविंद लिगाडे यांनी जागतिक स्तरावर जर्मन भाषेत सुमारे सात कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध असून भाषा अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्राप्त करून त्याचा लाभ घेता येईल, अशी माहिती दिली. जावेद अत्तार यांनी सद्यःस्थितीत भारतात ८३% अभियंते बेरोजगार आहेत; तर विदेशात सुमारे पंचवीस देशांमध्ये खात्रीशीर आणि सुरक्षित रोजगार संधी उपलब्ध आहेत. अर्थातच त्यासाठी विदेशी भाषांमध्ये प्रावीण्य मिळवणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. गंधाली शिधये यांनी जापनीज भाषेतील रोजगार संधींची माहिती दिली.

दीपप्रज्वलन आणि गणेशपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. भाषा अकॅडमीच्या वतीने विविध परकीय भाषांमध्ये प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले; तसेच विदेशातील रोजगार संधी, व्हिसा प्रक्रियेसाठी साहाय्य, विविध शिष्यवृत्ती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भाषा अकॅडमीच्या शिक्षिकांनी संयोजनात परिश्रम घेतले. दिशा जोशी आणि श्रद्धा काडेकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपक पागे यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version