पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पक्ष, पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध प्रकोष्ठांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र वितरण व कार्यकारिणी घोषणा समारंभ शनिवारी (दि. २० जून) सकाळी ११.०० वाजता भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय मोरवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे हे होते.
यावेळी वैद्यकीय प्रकोष्ठ, अभियांत्रिकी प्रकोष्ठ, दिव्यांग प्रकोष्ठ, बुद्धिजीवी प्रकोष्ठ आणि ओबीसी प्रकोष्ठ यांच्या नव्या कार्यकारिणींची अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
या समारंभात डॉ. अमित वामन नेमाणे यांच्याकडे पुन्हा भाजप वैद्यकीय प्रकोष्ठाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी त्यांनी ५४ डॉक्टरांचा समावेश असलेली वैद्यकीय प्रकोष्ठाची भव्य कार्यकारिणी जाहीर केली. पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टर भाजपच्या वैद्यकीय प्रकोष्ठात सक्रियपणे सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर अभियांत्रिकी प्रकोष्ठाच्या शहराध्यक्षपदी संतोष भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली असून अभियंत्यांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग या कार्यकारिणीत दिसून आला.
यावेळी बोलताना डॉ. अमित नेमाणे यांनी, “आरोग्य, सामाजिक सेवा आणि संघटनात्मक बळकटी या तिन्ही आघाड्यांवर वैद्यकीय प्रकोष्ठ प्रभावीपणे कार्य करेल. समाजहिताची विविध आरोग्य अभियाने आणि जनजागृती उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील,” असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, भाजप महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय प्रकोष्ठाचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपाळे, डॉ. श्यामसुंदर सोनावणे, डॉ. गायकवाड, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष चेतन भुजबल, भाजप महाराष्ट्र प्रदेशाचे माजी युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, वरिष्ठ भाजप नेते राजूभाऊ दुर्गे, भाजप शहर संघटन महामंत्री मोरेश्वर शेडगे, महामंत्री वैशाली खाडे, भाजप शहर कोषाध्यक्ष राजाभाऊ मासुळकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांना नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भाजप शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी केले.
