Spread the love

भ्रष्टाचार, लाचखोरी व महिला विनयभंगाच्या आरोपांमुळे कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून कठोर चौकशी करण्याची मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका वादग्रस्त कर्मचाऱ्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी नगरसेवक तथा शहर सुधार समिती सदस्य विनोद जयवंत नढे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक विभागात ‘अनुरक्षक’ पदावर कार्यरत असलेला दिलीप आडे हा कर्मचारी पूर्वीपासूनच विविध गंभीर आरोपांमुळे चर्चेत राहिला आहे. पाणीपुरवठा विभागात कार्यरत असताना त्याच्यावर निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडल्याने महापालिकेने त्याला यापूर्वी सेवेतून निलंबित केले होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, लाचखोरीसारख्या गंभीर प्रकरणात अडकलेल्या या कर्मचाऱ्याला पुन्हा महत्त्वाच्या विभागात नियुक्ती देण्यात आल्याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या जनगणना कार्याशी संबंधित ‘एफ’ क्षेत्रीय कार्यालयात त्याची नियुक्ती केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर टीका होत आहे.

दरम्यान, अलीकडेच माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जनगणना कार्यालयातील एका महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिला सुरक्षेबाबत प्रशासन संवेदनशील असल्याचा दावा करत असताना महापालिकेच्या अधिकृत कर्मचाऱ्यावरच असा आरोप होणे ही गंभीर बाब असल्याचे नढे यांनी नमूद केले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करावी, तसेच त्याला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोणी आणि कोणत्या निकषांवर दिल्या याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महिलांच्या सुरक्षेशी आणि महापालिकेच्या प्रतिमेशी संबंधित असलेल्या या प्रकरणात प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास जनहितासाठी आणि महिला सन्मानाच्या रक्षणासाठी महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक विनोद नढे यांनी दिला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version