Spread the love

विश्वशांती घुमटाच्या साक्षीने सामूहिक योगासने; ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’चा संदेश

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठात सामूहिक योगासनांच्या प्रात्यक्षिकांद्वारे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समग्र विश्वाला शांततेचा संदेश देणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती घुमटाच्या साक्षीने झालेल्या या योगोत्सवात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांनी निरोगी जीवनासाठी दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.

हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगातील सर्वात उंच ‘विश्वशांती घुमट’ या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला. विज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम साधणाऱ्या या भव्य घुमटाची संकल्पना व निर्मिती माईर्स शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली आहे.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी संघटना, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हिंग, सूर्या फाउंडेशन आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. मोहित दुबे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक व कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. अतुल पाटील, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड, कॅम्पस संचालक दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अतुल पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यापीठाच्या नियमित आरोग्य सराव सत्रांच्या व्हिडिओ अहवालाचे सादरीकरण आणि विशेष ‘योग पुस्तिकेचे’ प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुनीता कराड म्हणाल्या, “योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ती जीवन जगण्याची कला आहे. आपल्या धावपळीच्या युगात मानसिक संतुलन आणि शारीरिक सुदृढता राखण्यासाठी योग हाच एकमेव मार्ग आहे.”

कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. म्हणाले, “‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हा संदेश आजच्या तरुण पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे, जेणेकरून ते भविष्यात सक्षम नागरिक बनू शकतील.”

मुख्य सत्रात स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटच्या योग तज्ज्ञांनी उपस्थितांकडून ‘कॉमन योग प्रोटोकॉल’नुसार (CYP) योगासने आणि ध्यान सत्र करवून घेतले. राष्ट्रगीताने या यशस्वी सोहळ्याची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version