पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील पी. के. चौक सिग्नल परिसरात बीआरटी मार्गातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक विभागाने विशेष कारवाई केली आहे. बीआरटी मार्गाचा गैरवापर करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत प्रशासनाने तब्बल २ लाख ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बीआरटी मार्गावर होणारी अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. काही दिवसांपूर्वी बीआरटी मार्गाचा गैरवापर थांबवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बाप्पू) काटे, नगरसेविका अनिता संदीप काटे आणि नगरसेविका कुंदा संजय भिसे यांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतुकीमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित आणि जबाबदार नागरिकत्वाचे उदाहरण घालावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
