Spread the love

“सकारात्मकतेने आयुष्य सुंदर होते

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” जेष्ठ नागरिकांनी समाजाचे दीपस्तंभ बनावे. उत्तर आयुष्यात सेवा हा धर्म मानत आंधळ्याचा डोळा, पांगळ्याचा पाय आणि अनाथांचा नाथ होता आले पाहिजे. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी स्वतः सकारात्मक राहून मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करता आला पाहिजे.” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले आहे. प्राधिकरणाच्या सेक्टर २८ मधील संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये संत ज्ञानेश्वर हास्य योग संघाच्या एकविसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राजेंद्र घावटे यांचे “जगणे सुंदर आहे” या विषयावर व्याख्यान झाले.

या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर , प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, ह.भ.प. किसन महाराज चौधरी , माजी नगरसेविका भारती फरांदे, हास्ययोग संघाचे अध्यक्ष शाम खवले, माजी अध्यक्ष जगन्नाथ वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर खुळे व इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश वंदना व स्वागतगीताचे सादरीकरण पद्मा कुलकर्णी, मंगला नावंदर, सरोज भांडारकर, कुसुम बर्गे, कमल कारके आदी महिला सदस्यांनी केले.

राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, “मनाला मिळते ते समाधान, शरीराला मिळते ते सुख, आणि आत्म्याला मिळते तो आनंद. भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद महत्त्वाचा आहे. आचार, विचार, आहार, विहार यांच्या द्वारे आदर्श आचरणाने जीवन सुंदर होऊ शकते. आपले जीवन आपणच सुंदर बनवू शकतो. आयुष्य हा ऊनपावसाचा, आशा निराशेचा प्रवास आहे. आयुष्यात येणारी संकटे, अडीअडचणी, नैराश्य, दुःख, सुख, आनंद या सर्व गोष्टीमुळे जगण्याची चव वाढते. दुःखाने माणूस डोळस बनतो आणि अडचणीमुळे अनुभव वाढतात. ज्ञान, प्रज्ञा, व्यासंग आणि सत्संग यामुळे आयुष्याला उजाळा देत समृद्धीकडे वाटचाल करता येते. सिंहावलोकन करून जीवनातील प्रत्येक क्षण जपता आला पाहिजे. मृत्यू हे आयुष्याचे अंतिम आणि अटळ सत्य आहे. त्याची भीती न बाळगता दिलेल्या आयुष्यात स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निसर्गाचा संग, अध्यात्म, पर्यटन, कौटुंबिक जिव्हाळा, विविध छंद, सामाजिक पर्यावरण संवर्धन आदींसाठी केलेले काम यातून आयुष्य जगताना उत्तम अनुभूती मिळते.”

जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण या प्रसंगी करण्यात आले.

प्रास्ताविक शाम खवले यांनी केले.सूत्र संचालन वृषाली गुर्जर यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष राणे यांनी केले.
संयोजनात सुनील दुर्गे, जगन्नाथ वैद्य, कुसुम बर्गे, विजयमाला आहेर, पद्मावती कुलकर्णी, यांनी पुढाकार घेतला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version