Spread the love

देहूगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी “आषाढी वारी आरोग्य अभियान २०२६” अंतर्गत देहूगाव येथे अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवसानिमित्त सीपीआर (CPR) व प्राथमिक उपचार (First Aid) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा उपक्रम देहूगाव श्री संत तुकाराम महाराज संस्थान, संत तुकाराम अन्नदान मंडळ, आनंदक्षेत्र, MESMA Doctors Association, फोर्टिस हॉस्पिटल मुंबई तसेच सेंट जॉन इंटरनॅशनल अँब्युलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

यावेळी MESMA Doctors Association चे राज्याध्यक्ष डॉ. श्यामसुंदर सोनवणे, “CPR Man of India” व MESMA चे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंजीत सिंग अरोरा, MESMA Doctors Association चे राज्य उपाध्यक्ष डॉ. अमित नेमाणे, तसेच MESMA महिला आघाडीच्या राज्य संयोजिका डॉ. शीतल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान डॉ. अमित नेमाणे यांनी आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी वैद्यकीय स्वयंसेवकांचे जाळे उभारणे, मार्गावरील आरोग्य जनजागृती, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि सीपीआर प्रशिक्षणाची आवश्यकता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी वारी मार्गावर अधिकाधिक स्वयंसेवकांना प्रशिक्षित करून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

यावेळी “आषाढी वारी आरोग्य अभियान २०२६” ची औपचारिक घोषणा करण्यात आली. या अभियानांतर्गत वारी मार्गावर आरोग्य जनजागृती, मोफत आरोग्य तपासणी, सीपीआर व प्राथमिक उपचार प्रशिक्षण, आपत्कालीन वैद्यकीय मदत आणि स्वयंसेवक प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

आषाढी वारीदरम्यान हृदयविकाराचा झटका, उष्माघात, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सामान्य नागरिक, स्वयंसेवक आणि वारकरी यांना तातडीने मदत करता यावी, या उद्देशाने प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमात डॉ. मंजीत सिंग अरोरा आणि डॉ. श्यामसुंदर सोनवणे यांनी प्रत्यक्ष CPR, Recovery Position आणि आपत्कालीन परिस्थितीत द्यावयाच्या प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थित वारकरी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देहूगाव श्री संत तुकाराम महाराज संस्थान, संत तुकाराम अन्नदान मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप (तात्या) काळोखे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

येत्या वारी कालावधीत मार्गावरील विविध ठिकाणी अशाच प्रकारची CPR व प्राथमिक उपचार प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार असून हजारो वारकरी व स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version