स्व.अनंतराव थोपटे यांची सर्वपक्षीय शोकसभा संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री स्व.अनंतराव थोपटे यांचे नुकतेच ४ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले ते ९३ वर्षांचे होते.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व.अनंतराव थोपटे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे मासूळकर कॉलनी पिंपरी येथील स्व. नाना आफळे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले,
“काँग्रेस पक्षातील थोपटे साहेबांची मोठी कारकीर्द आजही कार्यकर्त्यांच्या स्पष्ट स्मरणामध्ये आहे, ते एक धडाडीचे, काँग्रेस विचारांचे निष्ठावंत पाईक आणि पुणे जिल्ह्यात तील काँग्रेसचे मोठे नेते म्हणून लोकप्रिय होते, ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगत की समोरचा पहिलवान जेव्हा अधिक बलाढ्य असतो तेव्हा आपण माती घट्ट धरून ठेवायची असते, म्हणजेच राजकारणात जनतेशी नातं कायम घट्ट ठेवत काम कराव असा संदेश त्यांनी दिला तो जगला आणि शेवटपर्यंत पाळला त्यांच्या अलौकिक कार्यरूपाने ते कार्यकर्त्यांच्या स्मरणात अनंत काळापर्यंत राहतील”.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनायक रणसुंभे म्हणाले, “त्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत प्रामुख्याने दोन-तीन नाव होती त्यात एक नाव अनंतराव थोपटे साहेबांचं होतं, सहा वेळा आमदार म्हणून भोर मधून निवडून आलेले थोपटे साहेब यांनी शिक्षण संस्था सुरू करून दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून दिली, ज्या ठिकाणी एसटी जात नव्हती अशा ठिकाणी रस्त्यांचं मोठं जाळ त्यांनी तयार केलं, गाव गाड्यांच्या परिसरात रस्ते तयार करण्याचे मौलिक काम त्यांनी केलं, शिक्षण, शेती, साखर कारखाना, सहकार हे जाळं त्यांनी यशस्वीरित्या विणलं”
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बी. आर. माडगूळकर म्हणाले,
“अनंतराव थोपटे हे भोरचे भाग्यविधाते होते. त्यांची नाळ तळागाळातील माणसाशी जोडलेली होती. ते एक सुसंस्कृत नेते होते. त्यांनी ग्रामीण भागाचा कायापालट कसा करावा याचे उदाहरण घालून दिले. त्यांनी आपले आयुष्य शेतकरी, मजूर, शिक्षक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी चंदनाप्रमाणे झिजवले. त्यांची काँग्रेस पक्षावर आणि विचारावर अविचल निष्ठा होती होती. त्यांनी वयाच्या विशि मध्ये काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला तो अखेरपर्यंत त्यांच्या खांद्यावर होता”
शोक सभेदरम्यान उपस्थित राहिलेले विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक सतीश दरेकर यांनी थोपटे साहेबांच्या स्मृतींना उजाळा देत जुन्या आठवणीतील त्यांचे किस्से सांगितले. यादरम्यान चिंतामणी सोंडकर, सुरज कुलकर्णी, उमेश बनसोडे, जितेंद्र छाबडा यांनीही श्रद्धांजलीपर मनोगते व्यक्त केली.
सर्वपक्षीय शोकसभेच्या कार्यक्रमादरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर, शिवसेनेचे शहर प्रमुख चेतन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल मासुळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनायक रणसुंभे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यु दहितुले, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश खंदारे, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बी आर माडगूळकर, निवृत्त शिक्षक सुरज कुलकर्णी, युवा नेते प्रद्युम्न चव्हाण, भोरचे युवा नेते चिंतामणी सोंडकर, व्यसनमुक्ती चळवळीतील विमल फाउंडेशनचे अध्यक्ष विल्यम साळवी, दिलदार पठाण, काँग्रेसचे माजी सरचिटणीस हिराचंद जाधव, विजय ओवाळ हरीश डोळस, जितेंद्र छाबडा, कुणाल भोसले, विक्रम महाबळेश्वरकर आदी उपस्थित होते.
