आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारी अंतर्गत श्रींचा रथ ओढण्यासाठी स्थानिक रानवडे घराण्यातील हर्षवर्धन प्रदीप रानवडे आणि तुळशीराम ज्ञानोबा रानवडे यांच्या बैलजोडीस मान मिळाला आहे. त्या प्रमाणे बैल जोड निवड समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी पालखी सोहळा प्रमुख एडवोकेट राजेंद्र उमाप आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांना समितीचा निर्णय पत्राद्वारे कळवून बैल जोड मानकरी यांच्या नावाची घोषणा करून पत्र दिले आहे. या वर्षी रानवडे घराण्याकडे बैलजोड देण्यासाठी रोटेशन असल्याने आलेल्या अर्जातून हर्षवर्धन रानवडे आणि तुळशीराम रानवडे यांच्या बैलजोडी साठी निवड समितीने मान्यता देऊन त्या प्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला पत्राद्वारे कळविले आहे.
या अनुषंगाने हर्षवर्धन रानवडे व तुळशीराम रानवडे यांना बैल जोड निवड समितीने पत्र देऊन कळविले आहे. आळंदी ते फलटण जाताना – येताना हर्षवर्धन रानवडे आणि फलटण ते पंढरपूर ते फलटण या दरम्यान तुळशीराम रानवडे अशी सेवा बैलजोड व्यवस्था पंढरपूर कडे जाताना व परत फलटण पर्यंत येताना बैलजोड मानकरी यांच्या माध्यमातून सेवा रुजू होणार आहे. अशी माहिती बैलजोड निवड समिती सदस्य माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी दिली आहे.
या संदर्भातील पत्र देताना बैलजोड समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, विलास घुंडरे पाटील, रामदास भोसले, ज्ञानोबा वहीले, सचिन रानवडे, तुळशीराम रानवडे, हर्षवर्धन रानवडे उपस्थित होते. दोन्ही सेवेस रुजू करणाऱ्या मानकरी यांनी या निवडीचे पत्र स्वीकारून संमती दिली असल्याचे समितीला सांगितले.
