Spread the love

एक्स-रे व सोनोग्राफीस विलंब झाल्याचा आरोप; मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचीही मागणी

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयातील कथित गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे एका निवृत्त महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, दिवंगत रावसाहेब वामन खंडागळे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निवृत्त कर्मचारी होते. शुक्रवार, ५ जून रोजी फुगेवाडी ते दापोडी दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीवरून जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात एक्स-रे मशीनची बॅटरी चार्ज नसल्याचे कारण देत खंडागळे यांचा एक्स-रे काढण्यास अर्ध्या तासाहून अधिक विलंब करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी वारंवार विनंती करूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी सहकार्य न करता उद्धट वर्तन केल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
यानंतर एक्स-रे झाल्यानंतर सोनोग्राफीसाठी देखील प्रतीक्षा करावी लागली. इमर्जन्सी रुग्ण असूनही इतर रुग्णांनंतरच तपासणी करण्यात आल्याने उपचारांना विलंब झाला. या दरम्यान अंतर्गत रक्तस्त्राव वाढल्याने खंडागळे यांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने जाहीर केले.

मानव कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, रोज हजारो रुग्णांवर उपचार करणाऱ्या वायसीएमसारख्या मोठ्या रुग्णालयात पुरेशी एक्स-रे व सोनोग्राफी यंत्रणा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. आठ हजार कोटी रुपयांहून अधिक अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात मूलभूत वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
खंडागळे हे स्वतः वायसीएममध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. रुग्णालयात दाखल होताना त्यांनी आपली ओळख सांगून तातडीने उपचार करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
नागरी हक्क सुरक्षा समितीने या घटनेची स्वतंत्र चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, रुग्णालय प्रशासनाला सुधारणा करण्याचे निर्देश द्यावेत, इमर्जन्सी रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे आणि पुरेशा प्रमाणात वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे.

तसेच दिवंगत रावसाहेब खंडागळे यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने योग्य आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत वायसीएम प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version