पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या PWD मैदान परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्यांचा उच्छाद वाढल्याचे समोर आले आहे. मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक कचरा व अस्वच्छता आढळून येत असून त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी नियमितपणे काही व्यक्ती एकत्र येऊन मद्यपान करत असून त्यानंतर वारंवार वाद, शिवीगाळ आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या या प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, हा परिसर सांगवी पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असूनही अशा प्रकारच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मैदान परिसरात साचलेला कचरा, फुटलेल्या बाटल्या आणि मद्यधुंद व्यक्तींमधील भांडणे यामुळे अपघात तसेच गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता वाढली आहे.
नुकत्याच पिंपरी-चिंचवड शहरात संशयित विषारी दारूमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या असताना सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकाराकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून या परिसरात नियमित गस्त वाढवावी, मद्यपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि मैदान परिसर नागरिकांसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
याशिवाय, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालावे, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन या परिसरात विशेष मोहीम राबवावी, अशीही नागरिकांची मागणी आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मद्यपान, वाढती अस्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
“सांगवी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर खुलेआम मद्यपान, भांडणे आणि अस्वच्छता सुरू असणे ही गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये. पोलीस आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण द्यावे,” अशी मागणी मेघराज लोखंडे यांनी केली.
मेघराज प्रिया सिद्धार्थ लोखंडे
जिल्हा उपाध्यक्ष ( मावळ लोकसभा ) युवासेना,शिवसेना.
