Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील स्पाईन रोडलगत असलेल्या भीमशक्तीनगर परिसरात विद्युत तारा धोकादायक पद्धतीने खाली लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी महावितरणच्या भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भीमशक्तीनगर हा दाट लोकवस्तीचा परिसर असून येथील अनेक ठिकाणी विद्युत तारा अत्यंत खाली आल्या आहेत. काही ठिकाणी या तारा घरांच्या अगदी जवळून जात असल्याने तसेच रस्त्यालगत लोंबकळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात सुमारे दहा हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून दररोज मोठ्या प्रमाणात पादचारी, विद्यार्थी आणि वाहनचालकांची वर्दळ असते.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या अनेक वर्षांपासून कायम असून वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
वादळी वारे, मुसळधार पाऊस किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळे या तारा तुटल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मारुती जाधव यांनी महावितरण प्रशासनाने तातडीने संबंधित परिसराची पाहणी करून लोंबकळणाऱ्या विद्युत तारा उंचावाव्यात, आवश्यक दुरुस्ती करावी तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याने महावितरण प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे. भीमशक्तीनगरमधील नागरिक आता महावितरणच्या त्वरित प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version