Spread the love

मोरवाडी न्यायालयात तीन नवीन न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायदान प्रक्रियेला मिळणार गती

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून मोरवाडी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात लवकरच तीन नवीन न्यायाधीश रुजू होणार आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांच्या सुनावणीला गती मिळून नागरिकांना जलद न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. ए. टी. वानखेडे यांनी आज मोरवाडी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला भेट देऊन न्यायालयीन सुविधांची आणि कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पुढील आठवड्यात दोन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच एक वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश नव्याने रुजू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा वाढता बोजा, अपुरी न्यायाधीश संख्या आणि त्यातून निर्माण होणारा विलंब याबाबत असोसिएशनने वारंवार न्यायालय प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येत असल्याने वकील वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बी. के. कांबळे, माजी अध्यक्ष ॲड. प्रमिला गाडे, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतीक जगताप, ॲड. तेजस चवरे, ॲड. जयेश वाघचौरे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

बैठकीदरम्यान वकिलांनी न्यायालयातील विविध समस्या आणि आवश्यक सुविधांबाबतही न्यायाधीशांचे लक्ष वेधले. या सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन श्री.वानखेडे यांनी दिले.
नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे न्यायालयीन कामकाजाचा वेग वाढणार असून प्रकरणांच्या सुनावणीत होणारा विलंब कमी होईल. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेत न्याय मिळण्यास मदत होणार असल्याने पिंपरी-चिंचवडमधील वकील वर्ग आणि न्यायप्रक्रियेशी संबंधित घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version