पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य आणि मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीचा उत्सव साजरा करत भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहरभर एक लाख वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या निर्देशानुसार शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या पुढाकाराने या महाअभियानाचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभियानाचे जिल्हा संयोजक म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांची नियुक्ती करण्यात आली असून, मनोज तोरडमल आणि रमेश वहिले हे सहसंयोजक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच खासदार प्रा. मेघा कुलकर्णी यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अभियानाचा शुभारंभ उद्या शुक्रवार, ५ जून रोजी सकाळी ७ वाजता दुर्गा टेकडी येथे एक हजार वृक्षांचे रोपण करून करण्यात येणार आहे. त्यानंतर चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीनही विधानसभा क्षेत्रांतील १४ मंडलांमध्ये तसेच बूथ स्तरापर्यंत दिवसभर वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या अभियानात शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते विविध ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग घेणार आहेत.
भाजपच्या नियोजनानुसार, ५ जून रोजी पहिल्याच दिवशी सुमारे १५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून पुढील पंधरा दिवसांत शहरभर एक लाखांहून अधिक वृक्ष लागवड पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत वृक्षारोपणाबरोबरच नदी स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती जनजागृती आणि स्वच्छता अभियान देखील राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमात सामाजिक संस्था, मंडळे आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वृक्षारोपणासोबतच वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारावी, असे आवाहन शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आणि अभियानाचे जिल्हा संयोजक मधुकर बच्चे यांनी केले आहे.
