Spread the love

नाले सफाईत ९२.३३ टक्के प्रगती; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर, महापालिकेकडून मान्सूनपूर्व तयारीला वेग

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील नाले सफाई मोहिमेला वेग आला असून, महापालिकेने हाती घेतलेल्या कामांपैकी तब्बल ९२.३३ टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरात पावसाचे पाणी तुंबणे, साचलेला गाळ आणि स्थानिक पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने यंदा नियोजनबद्ध आणि वेळबद्ध पद्धतीने मोहीम राबविल्याने नाले सफाईची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मार्च महिन्यापासून नाले सफाई मोहीम सुरू करण्यात आली होती. शहरातील एकूण १४१ नाले आणि ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांची साफसफाई हाती घेण्यात आली आहे. सुरुवातीला १६ मार्च रोजी केवळ ५.०४ टक्के प्रगती नोंदवली गेली होती. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात कामांना गती देण्यात आल्याने २५ मेपर्यंत ८५.८४ टक्के काम पूर्ण झाले आणि १ जूनअखेर ही प्रगती ९२.३३ टक्क्यांवर पोहोचली आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाहता काही विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाने १०० टक्के नाले सफाई पूर्ण करत आघाडी घेतली असून, ‘फ’ विभागात ९९.६१ टक्के तर ‘ई’ विभागात ९८.४४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विभागांमधील साफसफाईची कामेही अंतिम टप्प्यात असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण शहरातील नाले स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये साचणारा गाळ, प्लास्टिक व इतर कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडतो आणि अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. काही ठिकाणी स्थानिक पूरस्थितीही निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन यंदा महापालिकेने नाले सफाईचे नियोजन अधिक काटेकोर केले असून, संवेदनशील आणि पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचणे किंवा तुंबण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी नाले सफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांचा नियमित आढावा घेतला जात असून, निर्धारित मुदतीत आणि प्रभावी पद्धतीने कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.

तर उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, नाले सफाईची कामे केवळ प्रमाणावर न पाहता गुणवत्तेच्या निकषांवरही तपासली जात आहेत. नाल्यांमधून काढलेला गाळ आणि कचरा तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. तसेच पावसाळ्यात समस्या निर्माण होऊ शकणाऱ्या संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

महापालिकेकडून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरातील महापालिकेकडून सुरू असलेल्या या व्यापक नाले सफाई मोहिमेमुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरळीत राहण्यास मदत होणार असून, पाणी तुंबणे व स्थानिक पूरस्थितीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version