पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फुगेवाडी, दापोडी, काळेवाडी आणि परिसरात विषारी दारू सेवनामुळे 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच शहरातील सर्व अवैध दारू विक्री केंद्रे आणि हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात मनसेने म्हटले आहे की, ही घटना केवळ दुर्घटना नसून अवैध दारू निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांच्या बेकायदेशीर कारवायांचा थेट परिणाम आहे. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनसेने या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विषारी दारूच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतची संपूर्ण साखळी उघड करून संबंधित सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील अवैध दारू विक्री आणि हातभट्ट्यांना अभय देणारे, दुर्लक्ष करणारे किंवा कर्तव्यात कसूर करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र चौकशी करून त्यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत व पुनर्वसन सहाय्य मिळावे यासाठी शिफारस करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष धाडसत्र, स्टिंग ऑपरेशन आणि व्यापक कारवाई मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नियमित गस्त, धाडी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचेही मनसेने निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावेळी मनसेचे उपशहराध्यक्ष राजू साळवे, चंद्रकांत दानवले, सचिव रुपेश पटेकर, शहर संघटक विनोद भंडारी, उपविभाग अध्यक्ष अॅलेक्स अप्पा मोझस, सागर भोकरे, मनोज महाजन आणि पर्वेश शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
