Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात आठ जणांच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. फुगेवाडी परिसरातील या घटनेनंतर मृत्यूमागे विषारी गावठी दारू कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणात योगेश वानखेडे याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अवैध दारू व्यवसायावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात गावठी दारूसाठी स्पिरिट पुरवल्याचा आरोप योगेश वानखेडेवर आहे. आठ जणांच्या मृत्यूनंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आणि याच दरम्यान वानखेडे स्वतः राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर हजर झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.

पुण्यातील हडपसर परिसरातही काही जणांच्या विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याचाही तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

फुगेवाडी आणि आसपासच्या परिसरात अवैध हातभट्टी तसेच गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीत, पुरवण्यात येणाऱ्या दारूमध्ये स्पिरिट मिसळले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींनी गावठी दारू सेवन केल्याचा संशय आहे आणि त्याच दिशेने तपास सुरू आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण काय, हे वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

मात्र, या घटनेमागे नेमकं कारण गावठी दारूच आहे का, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडून संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version