पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणे ही उत्तम अभिवाचनाची पोचपावती असते!’ असे मत चिखली येथील प्रज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक संस्थेचे कार्यवाह यादवेंद्र जोशी यांनी कॅप्टन कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे (रविवार, दिनांक २४ मे) व्यक्त केले. रुद्रंग, निगडी, पुणे या संस्थेच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त रमेश यशवंत यांच्या निर्मिती, संहिता आणि दिग्दर्शनातून साकार करण्यात आलेल्या ‘लागले खूळ कलावंताला…’ या अभिवाचन मैफलीत प्रमुख पाहुणे म्हणून यादवेंद्र जोशी बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित किरण परळीकर, ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश कोकीळ, रुद्रंगचे अध्यक्ष रमेश वाकनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी किरण परळीकर यांनी, ‘संस्थेचा बारा वर्षांचा कार्यकाळ म्हणजे एक तपश्चर्याच असते; कारण ते असिधारा व्रत असते!’ असे गौरवोद्गार काढले. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर आणि गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सादर करण्यात आलेल्या ‘लागले खूळ कलावंताला…’ या मैफलीत नागेश जोशी, उज्ज्वला केळकर, सागर यादव, किशोरी सरीन, अरुणा वाकनीस, डाॅ. हेमंत हुईलगोळकर, स्मिता कुलकर्णी आणि रमेश वाकनीस यांनी मराठी, हिंदी आणि बंगाली भाषेतील निवडक अभिजात साहित्याचे अप्रतिम अभिवाचन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
नटराज पूजन आणि ‘महाराष्ट्र देशा… मंगल देशा…’ या गीताच्या गायनाने मैफलीचा प्रारंभ करण्यात आला. बाळकराम अर्थात राम गणेश गडकरी यांच्या ‘कवींचा कारखाना’ आणि ‘कविवर्य भांबूराव’ या विनोदी अन् उपहासात्मक लेखांच्या अभिवाचनातून शीघ्र कवींच्या बेसुमार कवितांनी सळो की पळो करण्याच्या वृत्तीवर केलेले त्रिकालाबाधित भाष्य श्रोत्यांना हसवून गेले; तर पोटासाठी देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या अव्यक्त व्यथांना नारायण सुर्वे यांच्या ‘मनीऑर्डर’ , ‘मास्तर तुमचंच नाव लिवा’ , शिल्पा देशपांडे यांची ‘भविष्यातील मुले’, सुरेश कोकीळ यांच्या रुबाया आणि मजरूह सुलतानपुरी यांच्या गझलेतून व्यक्त झालेल्या भावनांनी उपस्थितांना अंतर्मुख केले; तसेच रमेश वाकनीस लिखित ‘आकाशा’ या दीर्घकवितेच्या लयबद्ध तरीही गतिमान अभिवाचनाने सर्वांना खिळवून ठेवले. प्रसाद कुमठेकर यांच्या उदगिरी बोलीभाषेतील ‘बारकुल्या बारकुल्या गोष्टीं’तील ग्रामीण वास्तव दुःखाची अस्वस्थता मनाला बैचेन करून गेली. रवींद्रनाथ ठाकूर यांच्या ‘आमार प्राणेर माछे शुधा आछे…’ या बांगला भाषेतील गीताचा मन डोलावणारा नाद आणि रवींद्रनाथांच्या पत्नीच्या अंतर्मनातील सल मराठी अनुवादातूनही नेमकेपणाने श्रोत्यांच्या काळजाला भिडला. रुद्रंग आणि अनुसंधान कला संस्था परिवारातील सदस्यांनी संयोजनात सहकार्य केले. स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने मैफलीची सांगता करण्यात आली.
