Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील केशवनगर प्रभाग क्रमांक १८, चिंचवड परिसरात पहिल्याच पावसात अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे पितळ उघडे पडल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे महामंत्री मधुकर बच्चे यांनी केली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात कोणत्या भागात पाणी साचते याची प्रशासनाला पूर्ण कल्पना असतानाही यंदाही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकारी केवळ मोजक्या लोकांची कामे करत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही बच्चे यांनी म्हटले आहे.

राज पार्कच्या मागील परिसरात, शनी मंदिराजवळ तसेच श्री शिवाजी उदय मंडळ परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
या समस्येचा तातडीने सर्वे करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागेल, असा इशाराही मधुकर बच्चे यांनी दिला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version