Spread the love

– उर्वरित कामासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारणे साकारतेय अतिभव्य शंभूसृष्टी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ प्रकल्पाच्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत स्मारकाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

या प्रकल्पासाठी पालिकेतील सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी अतिरिक्त आयुक्त-१ विक्रांत बगाडे यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच स्मारकाच्या उर्वरित कामासाठी ‘टाईम बाउंड अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही आयुक्तांनी दिली.

मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे ही शंभूसृष्टी उभारली जात आहे. यावेळी बैठकीत स्मारकाचे प्रवेशद्वार ऐतिहासिक स्वरूपात उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला साजेसं भव्य, प्रेरणादायी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्फूर्तीस्थळ ठरणारं स्मारक पिंपरी-चिंचवडमध्ये उभारलं जात असल्याने जगभरातील शिव- शंभूप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त-२ तृप्ती सांडभोर, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, माणिक चव्हाण (विद्युत), कार्यकारी अभियंता नरोटे, सल्लागार तसेच ठेकेदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे.

“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान आगामी पिढ्यांपर्यंत पोहोचावे, हीच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ उभारण्यामागची प्रेरणा आहे. मोशी-बोर्‍हाडेवाडी येथे साकारत असलेले हे स्मारक केवळ शिल्प नसून, तमाम शिव-शंभू प्रेमींसाठी प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ ठरेल. दिवाळीपूर्वी शंभूसृष्टीचे काम पूर्ण करावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.

महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version