सोसायटीधारकांचा आर्थिक भार वाचणार; आयुक्त-आमदार बैठकीत मोठा निर्णय
ताथवडे-वाकडची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘फ्री लेफ्ट’ आणि रस्ते रुंदीकरणाचे थेट आदेश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे . सोसायट्यांच्या आवारातील झाडांच्या छाटणीसाठी (ट्रीमिंग) महापालिकेकडून आता एक स्वतंत्र ‘विशेष पॉलिसी’ (धोरण) तयार केली जाणार आहे. यामुळे या छाटणीचा संपूर्ण आर्थिक भार आता सोसायट्या आणि पर्यायाने नागरिकांवर पडणार नाही असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, पर्यावरण आणि नागरी सुविधांच्या संदर्भात सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, शहर अभियंता मनोज सेठीया, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, बापू गायकवाड, प्रेरणा सिनकर आणि अजय सूर्यवंशी यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
सध्या महापालिकेच्या माध्यमातून केवळ सार्वजनिक जागांवरील झाडांची छाटणी केली जाते, मात्र खाजगी सोसायट्यांच्या आवारातील झाडांच्या छाटणीसाठी कोणतीही आर्थिक किंवा प्रशासकीय तरतूद नव्हती. परिणामी, पावसाळ्यापूर्वी किंवा एरवी झाडांची छाटणी करताना सोसायट्यांना स्वतःच्या खिशातून मोठा खर्च करावा लागत असे. आता नवीन पॉलिसीमुळे नागरिकांची या आर्थिक त्रासातून मुक्तता होणार आहे. यासोबतच, पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणून शहरातील निर्माणाधीन (अंडर-कन्स्ट्रक्शन) रस्त्यांचे काम पूर्ण होण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला प्रत्येक दोन पोलच्या मध्ये किमान एक झाड लावणे बंधनकारक करण्याचे निर्देश आमदार जगताप यांनी दिले आहेत.
दरम्यान रेडी मिक्स काँक्रीट प्लांटमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पीसीएमसी , पीएमसी , एमपीसीबी आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. आरएमसीबाबत तयार करण्यात आलेल्या एसओपीचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १५० बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापुढे पर्यावरण मंजुरीच्या अटी-शर्तींमध्येच आरएमसीच्या नियमांचा समावेश केला जावा अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांचा सर्व्हे सुरू करण्यात आला असून, आगामी प्रारूप विकास आराखड्यात दर्जेदार शौचालयांसाठी राखीव जागा ठेवली जाणार आहे. विशेषतः महिलांसाठी “शी” शौचालयांची उभारणी करण्यासाठी सीएसआर फंडातून तरतूद करावी. तसेच, पिंपळे सौदागर येथे पोस्ट ऑफिससाठी जागा राखीव ठेवण्यात यावी अशी सूचना देखील करण्यात आली.
आगामी पावसाळा लक्षात घेता, शहरातील सर्व नाले आणि ओढ्यांची सफाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नाले व ओढ्यांच्या पात्रातील बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याचे थेट आणि पूर्ण अधिकार क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच काळेवाडी परिसरातील दूषित पाण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या सुमारे २,८०० कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळवून देणारी ‘आश्वासित प्रगती योजना’ व ‘सेवांतर्गत योजना’ लागू करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. यासोबतच, ‘माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत रात्रंदिवस काम करून नाव नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. तसेच, पुनावळे येथील जिल्हा परिषद शाळेचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया जलद केली जाईल असे ही आमदार जगताप यांनी सांगितले.
‘अर्बन स्ट्रीट’ अंतर्गत फुटपाथची रुंदी कमी करण्याची सूचना
बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तात्काळ आणि धडक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कस्पटे वस्ती रस्ता रुंदीकरणासह महत्त्वाच्या चौकांमध्ये ‘फ्री लेफ्ट’ मार्ग मोकळे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे वाहनचालकांचा प्रवासाचा वेळ वाचेल. पिंपळे सौदागर येथील स्वराज्य चौक अंडरपास आणि पीके चौक येथील उड्डाणपुलासाठी तातडीने निधीची तरतूद करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय महत्वाचे म्हणजे कल्पतरू चौक, आरके चौक आणि सांगवी फाटा येथे ‘अर्बन स्ट्रीट’ व स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आलेल्या फुटपाथची रुंदी कमी करून रस्ता रुंद केला जाईल. वाहतूक कोंडी आणि अपघातप्रवण क्षेत्र शोधण्यासाठी वाहतूक पोलीस आणि मनपा आयुक्त यांची संयुक्त बैठक होऊन तात्काळ तोडगा काढला जाईल असेही आमदार शंकर जगताप यांनी सांगितले .
“शहरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना झाडांच्या छाटणीसाठी स्वतःच्या खिशातून मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. हा जाचक खर्च वाचवण्यासाठी महापालिकेने विशेष आणि स्वतंत्र पॉलिसी तयार करावी, अशी सूचना मी प्रशासनाला केली आहे. यामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळेल. शहराचा विकास करताना पायाभूत सुविधांना गती देणे आणि सोबतच वाहतूक कोंडी, पर्यावरण संवर्धन व कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचे प्रश्न मार्गी लावणे यालाच आमचे प्राधान्य आहे. आजच्या बैठकीत घेतलेल्या सर्व निर्णयांची तातडीने आणि कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.”
शंकर जगताप
(आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ)
