Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चिखली परिसरातील वाढीव करवसुली, अपुऱ्या नागरी सुविधा आणि पाणीप्रश्नावर नगरसेवक विकास साने यांनी प्रशासनाला जोरदार धारेवर धरले. चिखली, चऱ्होली, किवळे, रावेतसह उपनगरांतील नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने कर आकारला जात असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सभागृहात बोलताना साने म्हणाले की, महापालिका नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल करते; मात्र त्याबदल्यात रस्ते, पाणी, लाईट यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे. “करवाढ मात्र झपाट्याने होते, पण सुविधा मात्र कागदावरच दिसतात,” असा घणाघात त्यांनी केला.

विशेषतः चिखली परिसराचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, वाकड आणि थेरगावप्रमाणेच येथेही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कर आकारला जातो. मात्र त्या दर्जाच्या सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा आणि वारंवार खंडित होणाऱ्या मूलभूत सेवांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच मोकळ्या जागांवर आणि गोठ्यांवरही कर आकारला जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “ज्या ठिकाणी सुविधा नाहीत, त्या नागरिकांकडून भरमसाठ कर आकारणे अन्यायकारक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

रेड झोनमधील नागरिकांना ५० टक्के करवसुली सवलतीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. “ही सवलत नेमक्या कोणत्या भागांना दिली आहे, याची स्पष्ट माहिती प्रशासनाने द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
“नागरिकांना सुविधा द्या, मग ते प्रामाणिकपणे कर भरतील. पण सुविधा न देता केवळ करवाढ केली तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा त्यांनी सभागृहात दिला.

पाणीप्रश्नासंदर्भात पुढील सभेमध्ये अधिक सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने तातडीने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version