पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील तीव्र पाणीटंचाईचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करत नगरसेविका श्रुती राम वाकडकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. वाकड, पुनावळे, ताथवडेसह अनेक भागांमध्ये कमी दाबाने व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
श्रुती वाकडकर म्हणाल्या की, नियमित कर भरूनही नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना दरमहा लाखो रुपये खर्च करून टँकरने पाणी खरेदी करावे लागत असून त्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.
शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता ‘पवना धरण बंद पाइपलाइन योजना’ तातडीने कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना पूर्ण झाल्यास पाणीगळती रोखून नागरिकांना नियमित, शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेत त्यांनी प्रशासनासमोर अनेक थेट प्रश्न उपस्थित केले. कर भरूनही नियमित पाणीपुरवठा का होत नाही, अनेक भागांत कमी दाबाने व अशुद्ध पाणी का येते, नागरिकांना टँकरवर अवलंबून का राहावे लागते आणि पवना धरण बंद पाइपलाइन योजना अद्याप प्रलंबित का आहे, असे सवाल त्यांनी केले.
टँकरमुक्त पिंपरी-चिंचवड निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी ही योजना तातडीने सुरू करून लवकर पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच प्रशासनाने त्वरित प्रभावी उपाययोजना न केल्यास नागरिकांचा रोष वाढू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
