Spread the love

सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नसरापूर येथील एका निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद सांगवी परिसरात उमटले. पीडितेवर झालेल्या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि तिला तात्काळ न्याय मिळावा या ठाम मागणीसाठी सांगवीतील विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक संघटनांच्या वतीने भव्य कॅंडल मार्च काढण्यात आला.

‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘अमानुष कृत्याचा तीव्र निषेध असो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

या कॅंडल मार्चची सुरुवात शितोळे नगर चौक येथून अत्यंत शांततेत झाली. अहिल्यादेवी होळकर पुतळा येथे नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन पीडितेबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि आरोपींविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, ही लढाई केवळ एका चिमुकलीपुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवण्याची आहे. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय समाजात भीती निर्माण होणार नाही, असे ठाम मत व्यक्त करण्यात आले.

या आंदोलनात सत्तारूढ पक्षाचे गटनेते प्रशांत शितोळे, रिपब्लिकन पक्षाचे युवा अध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड, गणेश ढोरे, रविंद्र निंबाळकर, कमलाकर जाधव, मेघराज लोखंडे, अवधूत कदम, राहुल ससाणे, भरत खरात, प्रसाद शिंदे, कलावती सोनवळकर, शुभदा मोरे, साई कोंढरे, राहुल नितीनवरे, संजय तरटे यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने सांगवीकर सहभागी झाले होते.
यावेळी दोन मिनिटे मौन पाळून चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कॅंडल मार्चच्या माध्यमातून सांगवीकरांनी एकजूट दाखवत प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला की, गुन्हेगारांना कठोरात कठोर कायदेशीर शिक्षा मिळालीच पाहिजे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version