Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील कु. कियान्श शर्मा याने ‘MaRRS International Spelling Bee Competition’ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

VIBGYOR Rise School, पिंपळे सौदागरचा विद्यार्थी असलेल्या कियान्शने २६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीत हे यश मिळवले. या स्पर्धेत विविध देशांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत कठीण स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि मेहनतीच्या जोरावर कियान्शने जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला.

कियान्शचा प्रवास शालेय स्तरापासून सुरू झाला. त्यानंतर आंतरशालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध फेऱ्या यशस्वीरित्या पार करत त्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली छाप उमटवली. त्याच्या या यशामुळे पिंपळे सौदागर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सत्कार प्रसंगी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “पिंपळे सौदागरमधील एका चिमुकल्याने जागतिक स्तरावर शहराचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले, ही अभिमानाची बाब आहे. कियान्शचे यश हे त्याच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि जिद्दीचे फळ असून तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल.”
या प्रसंगी कियान्शचे पालक, शिक्षक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्याच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version