पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘प्रत्येकाच्या योगदानातून हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे!’ असे आवाहन मन:शक्ती केंद्राच्या प्रा. डॉ. मंगला पानसरे यांनी गणेशनगर, थेरगाव येथे केले. एक मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगारदिन आणि बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. मंगला पानसरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी दिनेश जगताप, माध्यमिक विभागाच्या प्र. मुख्याध्यापिका सुनीता घोडे, प्राथमिक विभागाच्या प्र. मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे आणि प्रा. खुशाल पानसरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. मंगला पानसरे यांनी, ‘मानवता, राष्ट्र, व्यक्ती कल्याण नमस्तू!’ या प्रार्थनेने आपल्या मनोगताचा प्रारंभ करीत, ‘आपण सर्वांनी मिळून राष्ट्र उभारणीसाठी काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पाण्याचे महत्त्व, स्वावलंबन, आई-वडिलांना रोज नमस्कार करणे अशा सवयींचा अंगीकार करावा. पालकांनी मुलांना रोज नमस्कार केल्यावर शुभ आशीर्वाद द्यावा; कारण आशीर्वाद देताना आपल्या बोटांच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा मिळते. आपल्या बोटांमध्ये सुमारे पंधराशे पॉईंट्स असतात. आपण नेहमी प्रार्थना म्हटली पाहिजे; कारण प्रार्थनेमुळे आपल्या शरीरातील साडेबारा कोटी पेशी बदलतात. नेहमी चांगले सकारात्मक शब्द उच्चारणे आवश्यक आहे. नेहमी दुसऱ्यांबद्दल कृतज्ञता ठेवा. शिक्षकांना नमस्कार करा, त्यांच्याविषयी आदर बाळगा. विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करावा. बाहेरचे पॅकेट फूड खाऊ नये. घरचा खाऊ तसेच राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की, खजूर असे विविध पौष्टिक पदार्थ खावे कारण यामुळे आरोग्य चांगले राहते. पालकांनीही मुलांना घरी पौष्टिक पदार्थ बनवून देऊन खाऊ घालावे आणि बाहेरचे बेकरी प्रॉडक्ट शक्यतो टाळावे. संध्याकाळी साडेसात वाजता घरात रोज दिवा लावावा व प्रकाश प्रार्थना म्हणावी त्यामुळे घरात शांतता राहते!’ अशा विविध गोष्टी सांगून सर्वांना मार्गदर्शन केले. दिनेश जगताप यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून विद्यार्थ्यांना एक मे च्या शुभेच्छा देताना, ‘तुम्ही चांगले शिका. एक चांगला नागरिक व्हा. तुमचे नाव मोठे झाले तर तुमच्या शाळेचे नाव आपोआप मोठे होईल. आपले गुरुजन हे आपले मार्गदर्शक आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी कृती करावी. शाळेला भविष्यामध्ये जी काही मदत लागेल ते मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल!’ अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजनाने आणि ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्रगीत व संविधानाचे गायन करण्यात आले. साक्षी कुरळे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते संकुलातील बालवाडी ते माध्यमिक विभागातील सर्व वर्गातील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल पत्रक वाटप आणि बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. प्रीती पाटील यांनी संयोजनात सहकार्य केले; तसेच शिक्षकवृंद, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या एकत्रित सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. अंजली सुमंत यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता घोडे यांनी आभार मानले.
