Spread the love

ज्ञानेश्वरी ही एक जीवनप्रणाली! – डाॅ. भावार्थ देखणे
जिजाऊ व्याख्यानमाला – अंतिम पुष्प

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘भक्तीसोबतच माणसाला कर्मप्रवण करणारी ज्ञानेश्वरी ही एक जीवनप्रणाली आहे!’ असे प्रतिपादन डॉ. भावार्थ देखणे यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘एक तरी ओवी अनुभवावी!’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना डॉ. भावार्थ देखणे बोलत होते. चिंचवडगाव पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक दत्ता चासकर, नगरसेविका अपर्णा डोके, सामाजिक कार्यकर्त्या गीतल गोलांडे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, कार्याध्यक्ष ॲड. विपुल नेवाळे, सुहास पोफळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविकातून, ‘आम्ही मित्रमंडळींनी विद्यार्थिदशेत असताना जिजाऊ व्याख्यानमालेची सुरुवात केली. छत्तीस वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्याख्यात्यांनी वैचारिक प्रबोधन करून हा वटवृक्ष मोठा केला आहे. समाजातील विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याला अभिवादन करताना आम्हाला कृतज्ञता वाटते!’ अशी भावना. व्यक्त केली.

डॉ. भावार्थ देखणे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात संत नसते तर या भूमीला आपण महाराष्ट्र म्हणू शकलो नसतो. ज्ञानेश्वरमाउलींनी भागवत धर्माचा आणि सामाजिक समतेचा पाया रचला.

‘जे जे भेटिजे भूत
ते ते मानिजे भगवंत’

असे म्हणत माउलींनी समाजाला ब्रह्मसाक्षर केले. ब्रह्म हे सत्य, ज्ञान अन् अविनाशी तत्त्व आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माउलींनी गीतेवर भाष्य केले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीत मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. सलग साठ वर्षे ज्ञानेश्वरीवर निरुपण केल्यावर धुंडामहाराज देगलूरकर नम्रतेने
म्हणत की, अजूनही मला ज्ञानेश्वरी पूर्ण कळलेली नाही. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी कर्मजागृती करतात. कर्म, विकर्म आणि अकर्म अशा कर्माच्या अवस्था आहेत. निरपेक्ष आनंद मिळविण्यासाठी जेव्हा आपण कर्मप्रवृत्त होतो, तेव्हाच ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ कळायला लागतो!’

व्याख्यानापूर्वी, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने डॉ. भावार्थ देखणे (चिंतामणी पुरस्कार), डॉ. चंद्रकुमार देशमुख (क्रांतिवीर चापेकर पुरस्कार) आणि लता टाकळकर (जिजाऊ पुरस्कार) यांना प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी केशव शंखनाद पथकाने शंखनाद करून उपस्थितांना मंगल वातावरणाची अनुभूती दिली. पुरस्कारार्थींनी मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली.

गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या सदस्यांनी संयोजनात सहकार्य केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. महेश गावडे यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version