Spread the love

विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचे अभिषेक बारणे यांच्याकडून कौतुक

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’ (प्रकल्प आधारित शिक्षण) ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केले.

काळेवाडी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने ‘प्रोजेक्ट बेस्ड एक्झिबिशन’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य रितू पचारिया आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, भाजपा मंडल अध्यक्ष सनी बारणे, शाळेचे शिक्षक, आकांक्षा फाउंडेशनचे प्रतिनिधी, पालक आणि निमंत्रित सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थेरगाव येथील शाळेच्या सेकंडरी कॅम्पसमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि सामाजिक जाणीव या विषयांवर आधारित अत्यंत कल्पक आणि वैविध्यपूर्ण प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, ते प्रयोगांच्या माध्यमातून कसे मांडता येईल, याचे उत्तम सादरीकरण या प्रदर्शनातून केले. यावेळी सभापती अभिषेक बारणे यांनी प्रत्येक प्रकल्पाची बारकाईने पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिषेक बारणे म्हणाले की, “पुस्तकी ज्ञानासोबतच प्रकल्पांच्या माध्यमातून मिळणारे शिक्षण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वाढवते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून महापालिका शाळांच्या गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस उंचावणारा आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या प्रकल्पांचे आणि शाळेच्या या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

महापालिका शाळांमधील ही बदलती आणि आधुनिक शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देतात. त्यामुळे आगामी काळात हे ‘प्रोजेक्ट बेस्ड एक्झिबिशन’ केवळ एका शाळेपुरते मर्यादित न ठेवता, संपूर्ण शहर पातळीवर आयोजित करण्यासाठी प्रशासन स्तरावर नक्कीच प्रयत्नशील राहू.”

– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version