महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘एआययू’च्या १०० व्या वार्षिक महासभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
“नवोन्मेष, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण ‘विकसित भारत’ घडवू शकतो; असा भारत, जिथे प्रगतीचे फायदे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील आणि विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञानी न होता समाजात संधी निर्माण करणारे आणि समस्या सोडवणारे नागरिक बनावे”. : राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते आज पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्’ (AIU) च्या १०० व्या वार्षिक महासभेचे आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे दिमाखदार उद्घाटन झाले. २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेचा मुख्य विषय “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे” हा आहे.
भारतीय विद्यापीठ संघाच्या (AIU) या शताब्दी परिषदेसाठी देशभरातून ३०० हून अधिक कुलगुरू, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक कुलगुरूंचे आणि पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे, मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील, प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटी, पुणे, मा. डॉ. सौ. स्मिता जाधव, प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे, मा. डॉ. यशराज पी. पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे यांनी व्यक्तिशः उपस्थित राहून पाहुण्यांचे स्वागत केले.
या उद्घाटन प्रसंगी मा. डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे, भारतीय विद्यापीठ संघाचे अध्यक्ष व कानपूर विद्यापीठाचे कुलगुरू – प्रा. विनय कुमार पाठक, सरचिटणीस आणि सदस्य सचिव – डॉ. पंकज मित्तल, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. जे. पवार आणि देशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.
