पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) या महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर पिंपरी-चिंचवड शहरातून जोरदार जनसमर्थन उमटताना दिसत आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू असलेल्या या चळवळीला शहरातील विविध समाजघटकांनी अभूतपूर्व, ठाम आणि लढाऊ पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात विविध समाजांच्या प्रतिनिधींची व्यापक आणि दिशादर्शक बैठक पार पडली.
या बैठकीस सुमारे 300 ते 350 प्रतिनिधी विविध समाजातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही उपस्थिती केवळ संख्यात्मक नसून सामाजिक प्रश्नांविषयीची जागरूकता, अस्मिता आणि न्यायासाठी लढण्याची तयारी दर्शवणारी ठरली.
बैठकीत उपवर्गीकरणाचा मुद्दा हा केवळ धोरणापुरता मर्यादित नसून, सामाजिक समता, हक्कांचे न्याय्य पुनर्वाटप आणि ऐतिहासिक अन्याय दुरुस्तीचा मूलभूत प्रश्न असल्याचे ठामपणे मांडण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचा एकमुखी सूर उमटला.
चर्मकार, वाल्मिकी आणि मादीगा समाजांनी विशेषतः ठाम भूमिका घेत या मागणीस जोरदार पाठिंबा दिला. “आरक्षणातील समानता नव्हे, तर न्याय्य वाटप हा आमचा घटनात्मक अधिकार आहे,” अशी भूमिका उपस्थितांनी स्पष्ट केली.
या बैठकीस विधानपरिषद आमदार अमित गोरखे उपस्थित राहून त्यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका अधोरेखित केली.
बैठकीत भाऊसाहेब अडगळे, संदिपान झोंबाडे, अरुण जोगदंड, युवराज दाखले, मारुती जाधव, भगवान शिंदे, बाबू पाटोळे, संजय ससाणे, अण्णासाहेब कसबे, संजय धुतडमल, चंद्रकांत लोंढे, अविनाश कांबीकर, अविनाश शिंदे, डी.पी. खंडाळे, नाना कसबे, अनिल गायकवाड, निलेश गायकवाड, आनंद कांबळे, विशाल कसबे, नितीन घोलप, शंकर खवळे, सुनील भिसे, राजू आवळे, धीरज सकट, सविता आव्हाड, कविता बोराडे, अमोल कुचेकर, अश्विनी जाधव, हिरामण खवळे, गणेश लोंढे, अक्षय उदगिरे, सनी गवई, मारुती सोनटक्के, अण्णा लोखंडे, विठ्ठल शिंदे, स्वप्नील वाघमारे, अमोल खंडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या बैठकीतून विविध समाजघटकांमध्ये निर्माण झालेली एकजूट, समन्वय आणि लढाऊ भूमिका ही चळवळीची मोठी ताकद ठरत असल्याचे स्पष्ट झाले. ही बैठक केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता, आगामी काळात व्यापक आंदोलनाची नांदी ठरणार असल्याचे संकेत देण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमधून उमटलेला हा एकसंघ आवाज राज्याच्या सामाजिक धोरणांवर परिणाम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
