महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पीय प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला असून, तब्बल 1100 कोटी रुपयांच्या उपसूचनांना विषयपत्रिकेत उल्लेख नसतानाही मंजुरी दिल्याची घोषणा केल्याने पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सोमवारी (दि. 20) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेसमोर एकूण 15 विषय निश्चित होते. मात्र, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. त्याचवेळी ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ संसदेत मंजूर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी काँग्रेस व मित्र पक्षांविरोधात घोषणाबाजी करत राजकीय वातावरण तापवले.
या गोंधळात एकाही विषयावर प्रत्यक्ष चर्चा झाली नाही. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्याला नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी सभा तहकूब करताना अचानक अर्थसंकल्पीय उपसूचनांबाबत घोषणा केली.
महापौरांनी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पातील सर्व उपसूचना ग्राह्य-अग्राह्य धरून सुधारित अर्थसंकल्प मंजूर केल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे, या संदर्भातील कोणताही मुद्दा विषयपत्रिकेत नव्हता, तसेच सभागृहात कोणतीही चर्चा किंवा मतदानही झाले नव्हते.
या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला असून, इतक्या मोठ्या आर्थिक निर्णयाची प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबवण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही नगरसेवकांनी हा प्रकार संभाव्य आर्थिक गैरव्यवहार झाकण्याचा प्रयत्न असल्याचीही शंका व्यक्त केली आहे.
दरम्यान, महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप यांनी स्पष्ट केले की, त्या दिवशीच्या विषयपत्रिकेत अर्थसंकल्प किंवा उपसूचनांबाबत कोणताही मुद्दा समाविष्ट नव्हता. त्यामुळे महापौरांच्या घोषणेवर अधिकच प्रश्न उपस्थित होत आहेत.
सभेत नियोजित विषयांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड, विकास आराखड्यावरील हरकतींची सुनावणी, विविध प्रकल्पांसाठी निधी तरतूद, कररचना बदल, पाणीपुरवठा व गृहनिर्माण योजना यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता. मात्र, या सर्व विषयांवर चर्चा न होता सभा तहकूब करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासनिक पारदर्शकता, नियमबद्धता आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील सभेत यावर तीव्र राजकीय संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
