Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील रिक्षा स्टँड हे केवळ प्रवासासाठीचे ठिकाण न राहता ‘आदर्श समाजसेवा केंद्र’ म्हणून विकसित व्हावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केले. भोसरी येथील यशवंतनगर चौकात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शहर हे कष्टकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांचे असल्याने रिक्षा ही वाहतुकीची महत्त्वाची कडी आहे. मात्र, केवळ प्रवास सेवा देण्यापुरते मर्यादित न राहता रिक्षा चालकांनी नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन करत सामाजिक जबाबदारीही पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

२० वर्षांच्या संघर्षाचा आढावा
महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगत कांबळे यांनी संघटनेच्या लढ्याचा आढावा घेतला. २००६ पासून रिक्षा चालकांच्या हक्कांसाठी अनेक आंदोलनं आणि पाठपुरावा करण्यात आला. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना आणि ‘मुक्त रिक्षा परवाना’ धोरण बंद करण्यासाठीचा लढा यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे चालकांना मोठा दिलासा मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यभर विस्तारलेली संघटना
आज महाराष्ट्र रिक्षा पंचायत ही राज्यातील सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक बनली असून पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बीडसह आठ जिल्ह्यांत कार्यालये कार्यरत आहेत. तसेच सर्व ३६ जिल्ह्यांत पदाधिकारी सक्रिय असून रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले जात असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास विभागाध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष नदीम शेख, स्टँड अध्यक्ष अंकुश काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष शाम वाघमारे, खजिनदार लखन मस्के, सचिव विशाल लगाडे तसेच कार्यकारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटन सोहळ्यास परिसरातील रिक्षा चालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version