पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नारी शक्ती वंदन विधेयकाच्या मुद्द्यावरून देशभरात राजकीय वातावरण तापलेलं असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही त्याचे पडसाद उमटले. इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात निषेध आंदोलनं सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आज झालेल्या सर्वसाधारण सभेतही भाजपने आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदवला. आजच्या सभेत अनेक महिला नगरसेविकांनी काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला.
सभागृहात वातावरण तापलेलं असतानाच ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर महापौर रवी लांडगे, विधान परिषद आमदार उमा खापरे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सुलभा उबाळे तसेच महिला आणि पुरुष नगरसेवक मोठ्या संख्येने महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले. यावेळी इंडिया आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“या इंडिया आघाडीचं करायचं काय?” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मात्र, याच वेळी घोषणाबाजीदरम्यान एक अनपेक्षित आणि मजेशीर प्रसंग घडला. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या तोंडून “या सरकारचं करायचं काय?” अशी घोषणा निघताच, त्याला प्रतिसाद देताना महापौर रवी लांडगे, आमदार उमा खापरे आणि इतर नगरसेवकांनी “खाली डोकं वर पाय” अशा घोषणा दिली. क्षणभरासाठी हा नारा स्वतःच्याच सत्ताधारी सरकारच्या विरोधात गेल्याचं चित्र निर्माण झालं आणि उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला.
ही चूक लक्षात येताच प्रशांत शितोळे यांनी लगेच सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डोक्याला हात लावत घोषणा दुरुस्त केली. मात्र, तोपर्यंत हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आला होता आणि त्याची चर्चा सुरू झाली. राजकीय वर्तुळातही या घटनेची चांगलीच रंगतदार चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांची पूर्वी विरोधी पक्षातील भूमिका असल्याने त्यांना अशा घोषणांची सवय असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. महाराष्ट्रात आणि महानगर पालिकेत सत्ताधारी असतानाही घोषणेत झालेल्या या गोंधळामुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात काही काळ खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
आमदार उमा खापरे यांची इंडिया आघाडीवर टीका
दरम्यान, या आंदोलनावेळी बोलताना आमदार उमा खापरे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. “नारी शक्ती वंदन कायदा मंजूर होईल अशी देशभरातील महिलांची अपेक्षा होती. मात्र, काँग्रेस आणि इंडिया आघाडीने विरोध करून त्या अपेक्षांवर पाणी फेरलं. महिलांना नेतृत्व मिळण्याची मोठी संधी त्यांनी हिरावून घेतली,” असं त्या म्हणाल्या.
तर शिवसेना महिला संघटिका सुलभा उबाळे यांनीही या विधेयकाला विरोध केल्याबद्दल इंडिया आघाडीचा निषेध केला. “महिलांना या विधेयकाची मोठी अपेक्षा होती. मात्र, विरोधकांनी राजकारण करत हे विधेयक पुढे जाऊ दिलं नाही,” असा आरोप त्यांनी केला.
एकूणच, नारी शक्ती वंदन विधेयकाच्या निषेधासाठी झालेलं आंदोलन हे गंभीर राजकीय मुद्द्यावर आधारित असलं तरी घोषणाबाजीदरम्यान घडलेल्या या प्रसंगामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘त्या’ घोषणेचीच जास्त चर्चा रंगताना दिसत आहे.
