Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘NCMC कार्ड’ सेवेचा लाभ ज्येष्ठ नागरिक व महिलांना सुलभ व्हावा, यासाठी सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेत समाजोपयोगी उपक्रम राबविला आहे. किवळे-रावेत परिसरातील आदर्श नगर येथील विरंगुळा केंद्रात थेट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

एसटी बस स्थानकांवर जाऊन रांगेत उभे राहणे, वारंवार फेऱ्या मारणे यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन संघाने अधिकृत एजंटच्या माध्यमातून ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिली. आतापर्यंत सुमारे २७५ ज्येष्ठ नागरिक व महिलांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारची सुविधा देणारा सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ हा पहिलाच संघ ठरला आहे.
या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत असून, लाभार्थींनी संघाचे आभार मानले असल्याची माहिती खजिनदार प्रकाश सावंत यांनी दिली.

संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे यांनी सांगितले की, संघामार्फत दरवर्षी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. तसेच, सभासदांचे वाढदिवस साजरे करून त्यादिवशी कविता, भारूड, भावगीते यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्याची सदस्यांना विशेष उत्सुकता असते. सचिव सुरेश बडगुजर यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी देशभर सहलींचे आयोजन केले जाते. याशिवाय योगाचे वर्ग दररोज दोन सत्रांत घेतले जातात, तसेच आठवड्यातून पाच दिवस भजन कार्यक्रमही आयोजित केले जातात.

या उपक्रमाच्या आयोजनात अध्यक्ष सुदाम दिवटे, उपाध्यक्ष साहेबराव पाटील, सचिव सुरेश बडगुजर, खजिनदार प्रकाश सावंत, सहखजिनदार किशोर गायकवाड, सहसचिव तुकाराम कोरडे, संचालक रंजना सस्ते, धोंडीराम पाटील, रवींद्र मोरे आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version