Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील मुंबई–बंगळुरू महामार्गावरील वाकड ब्रिजखालील परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स वाहनांची अनियमित थांबणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष  विशाल शंकर वाकडकर यांनी वाकड वाहतूक पोलीस विभागाकडे लेखी निवेदन देत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वाकड ब्रिजखालील हा परिसर शहरातील अत्यंत वर्दळीचा असून, येथे सतत वाहनांची मोठी ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांना घेण्यासाठी व सोडण्यासाठी रस्त्याच्या कडेला तसेच अनेक वेळा रस्त्याच्या मधोमधच वाहने उभी करत आहेत. या अनियंत्रित थांबणीमुळे रस्त्यावर अनावश्यक अडथळे निर्माण होऊन वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे. परिणामी वाहनांच्या तब्बल २ ते ३ किमीपर्यंत रांगा लागत असून, नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ही समस्या अधिक तीव्र होत असून, रुग्णवाहिका, शालेय बस तसेच आपत्कालीन सेवांना देखील मार्ग काढणे कठीण होते. यामुळे केवळ वेळेचा अपव्यय होत नाही, तर अपघातांचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यावसायिक यांच्याकडून या समस्येबाबत सतत नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी ट्रॅव्हल्स वाहनांना थांबण्यास तातडीने बंदी घालण्यात यावी, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियमित पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, तसेच पर्यायी ठिकाणी अधिकृत पिक-अप व ड्रॉप पॉइंट निश्चित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करून शिस्त प्रस्थापित करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ ठोस उपाययोजना केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version