Spread the love

 

पर्यावरण आणि आरोग्याचा सुंदर संगम; महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याचा नवा पायंडा

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशन, पिंपळे सौदागर यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सामाजिक बांधिलकी जपत आणि वेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत १३५ रोपांचे वाटप करण्यात आले, तसेच आरोग्य सेवेच्या दृष्टीने सनराईज मेडिकल फाउंडेशनला चार व्हीलचेअर प्रदान करण्यात आल्या. पर्यावरण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला.

हा कार्यक्रम उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय, पिंपळे सौदागर येथे पार पडला. उन्नती सोशल फाउंडेशनने महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यासाठी एक वेगळा आणि सकारात्मक पायंडा समाजात रुजवला आहे. पारंपरिक मिरवणुका, डीजे व कर्णकर्कश आवाज टाळून प्रतिमापूजन व समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यावर फाउंडेशनचा भर असतो. यापूर्वीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त ३५० रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला होता.

या अनोख्या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले समतेचे, बंधुतेचे आणि सामाजिक न्यायाचे विचार हे केवळ वाचनापुरते न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे आवश्यक आहे. जयंती साजरी करताना केवळ उत्सव न करता समाजाला काहीतरी सकारात्मक देण्याची भूमिका उन्नती सोशल फाउंडेशनने कायम ठेवली आहे. पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य सेवा या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या बाबी असून, या उपक्रमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य अधिक व्यापक करण्याचा आमचा मानस आहे.”

बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजच्या काळात महापुरुषांच्या जयंती म्हणजे केवळ मिरवणुका, डीजे आणि औपचारिक कार्यक्रम यापुरतेच मर्यादित राहू नयेत. बाबासाहेबांनी दिलेला विचार हा समाज परिवर्तनाचा आहे आणि तो प्रत्यक्ष कृतीतूनच पुढे नेला जाऊ शकतो. उन्नती सोशल फाउंडेशनने जयंती साजरी करण्याचा जो वेगळा आणि विधायक मार्ग निवडला आहे, तो खरोखरच अनुकरणीय आहे. १३५ रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे आणि गरजूंसाठी व्हीलचेअर प्रदान करून आरोग्य सेवेला हातभार लावणे हे बाबासाहेबांच्या विचारांशी पूर्णपणे सुसंगत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढते आणि नव्या पिढीसमोर एक आदर्श उभा राहतो. भविष्यात अधिकाधिक संस्था अशा प्रकारचे उपक्रम राबवतील, अशी अपेक्षा आहे.”

कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी झुंज फाउंडेशनचे अध्यक्ष राजू हिवरे, बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, सनराईज मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन शंतनू कांबळे, आनंद हास्य क्लबचे अध्यक्ष राजगुरे, तसेच सिनियर गार्डन सिनियर क्लबचे अध्यक्ष वायकर , उन्नती फाउंडेशन सभासद, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, लिनियर गार्डन जेष्ठ नागरिक संघ, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय, यांच्यासह पिंपळे सौदागर , रहाटणी मधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version