Spread the love
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “आजच्या विज्ञानयुगात गावे बदलत आहेत.काकड आरती आणि भूपाळीने गावगाड्याची सुरुवात व्हायची आणि दिवस भजन किर्तनाने संपायचा. गावात प्रत्येक माणूस हा वैशिष्ट्यपूर्ण स्वभावाचा होता. पण आत्मीयता आणि जिव्हाळा होता. संतांनी नेहमीच भोंदूपणावर कोरडे ओढले.आज भोंदू बाबांचे पेव फुटले आहे. जगण्याचा वेदनेतून लोक भोंदूगिरीला बळी पडत आहेत. गावपण जपताना माणसाने शहाणे होणे गरजेचे आहे. वेदनेचा आक्रोश जाणावा लागेल. गावगाड्यातील प्रत्येक अनुभवांवर लिहिणे ही कृतज्ञता आहे. माणसातील प्रतिभा जागवणारी ग्रामसंस्कृती जपणे ही काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन माजी आमदार आणि  प्रथितयश रसिकराज उल्हासदादा पवार यांनी केले आहे.
जेष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी या आपल्या  पूर या मूळ गावाचे चरित्र “गांव तसं चांगलं” या पुस्तकातून साकारले आहे. त्याचा प्रकाशन समारंभ निगडी येथील ग दि माडगूळकर सभागृह येथे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व माजी आमदार रसिकराज उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला……
या प्रसंगी लेखक दादाभाऊ गावडे, ह. भ.प. चंद्रकांत वांजळे, प्रा. तुकाराम पाटील, अरुण बोऱ्हाडे, राजेंद्र घावटे, संदीप तापकीर, अमृता देसरडा, विजय भिसे , प्रा. पांडुरंग गाडीलकर, वंदना गावडे, श्रद्धा रवी लांडगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, ” माती, नाती आणि संस्कृतीचा लळा काळजामध्ये ठसतो. काळजात रुजलेल्या आठवणी सदैव टिकतात. गावगाड्यात जाती पाती पलीकडे जाऊन समाज जपला जात असे. हरवत चाललेला गाव परत जवळ यावा..गावांशी नाळ जोपासत प्रत्येक गाव आदर्श होण्यासाठी त्या त्या गावाच्या सुपुत्रांनी प्रयत्न करावा.”
लेखक दादाभाऊ गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आपल्या गावगाड्यातील अठरापगड माणसे हीच आपली लेखन प्रेरणा आहे, असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली.
निवृत्त आय. बी. अधिकारी राम गावडे,  डॉ सीमा काळभोर, सोपान खुडे, डॉ. पौर्णिमा कोल्हे, रामभाऊ सासवडे, पूर (राजगुरूनगर) चे सरपंच संदीप गावडे, पुरुषोत्तम सदाफुले यांची विशेष उपस्थिती होती.
वंदना गावडे, मुरलीधर गावडे, नारायण अनाजी गावडे, गुलाब गावडे , सचिन गावडे,पराग गावडे, संदीप गावडे यांनी संयोजनात  पुढाकार घेतला.संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले.सतिश गावडे यांनी आभार मानले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version